देशभरातील विविध रेल्वे फलाट आणि परिसर येथे १७९ अनधिकृत धार्मिक स्थळे अस्तित्वात ! – केंद्रीय रेल्वेमंत्री

इतक्या प्रमाणात अनधिकृत धार्मिक स्थळे बांधली जाईपर्यंत रेल्वे प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असणार्‍या अधिकार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

नवी देहली – देशभरातील विविध रेल्वे फलाट (प्लॅटफॉर्म) आणि परिसर येथे १७९ अनधिकृत दर्गे, मशिदी आणि मंदिरे अशी धार्मिक स्थळे अस्तित्वात आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ३० जुलै या दिवशी राज्यसभेत दिली.

वैष्णव पुढे म्हणाले, ‘‘ही सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासन, रेल्वे संरक्षण दल (आर्.पी.एफ्.) आणि स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून चालू आहेत. या सर्व धार्मिक स्थळांची नोंदणी करण्यात आली असून ती आणखी वाढू न देण्याची काळजी घेतली जात आहे.’’

वैष्णव म्हणाले की, ही अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यात जनतेची आंदोलने, राज्य सरकारांचे सहकार्य नसणे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, अशा अनेक अडचणी आहेत. सदर अनधिकृत धार्मिक स्थळे रेल्वेच्या सीमेबाहेर हालवण्यासाठी अशा धार्मिक स्थळांशी संबंधित व्यक्तींचे मन वळवण्याचेही प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केले आहेत.