सातारा नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांना जीव मुठीत धरूनच फिरावे लागेल !
सातारा, १ ऑगस्ट (वार्ता.) – येथील सदरबझार परिसरातील पिसाळलेल्या कुत्र्याने १४ जणांचा चावा घेतला आहे. त्यामुळे कसाई गल्ली, बागवान गल्ली, लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कुत्र्याने अन्य कुत्र्यांचा चावा घेतला, तर तेही पिसाळतील, या भीतीपोटी पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. या कुत्र्याने एका रेडकूचाही चावा घेतला होता.
सदरबझार परिसरामध्ये अनेक घरांत पशूंची हत्या केली जात असल्याने जनावरांचे मांस इतरत्र टाकले जाते. हे मांस खाण्यासाठी कुत्रे एकत्र येतात. त्यांची आपसांत भांडणे होतात. येणारे-जाणारे नागरिक, वृद्ध, तसेच खेळणारी लहान मुले यांनाही कुत्रे लक्ष्य करून त्यांचा चावा घेतात.