‘कास्टींग काऊच’मध्ये तरुणीचा गैरफायदा घेतल्याचे प्रकरण
ठाणे, ३१ जुलै (वार्ता.) – हिंदी चित्रपटामध्ये भूमिका देतो, असे सांगून तरुणीचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात असलेला ‘कास्टींग’ दिग्दर्शक आणि त्याचे सहकारी अशा चौघांना येथील घोडबंदर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी चोप दिला. नंतर आरोपी गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव या चौघांनाही पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. या संदर्भातील माहिती मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून दिली.
याविषयी ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून बोलतांना अमेय खोपकर म्हणाले की, चित्रपटसृष्टीत सध्या परप्रांतीय गुंडांचा सुळसुळाट झालेला आहे. आपल्याच राज्यातील नेत्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या या गुंडांकडून माझ्या महाराष्ट्रातल्या मायभगिनींना ‘कास्टींग काऊच’चा सामना करावा लागत आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. ‘महाराष्ट्र सैनिक’ अशा गुंडांची गय करणार नाही. मनोरंजन क्षेत्रात आपल्या आयुष्यातील पुढील वाटचाल (करिअर) घडवण्याच्या उद्देशाने संघर्ष करत असलेल्या मायभगिनींना आमचा शब्द आहे की, पुन्हा तुमच्याबरोबर असा गलिच्छ प्रकार होऊ देणार नाही. कुणाच्याही आमिषाला बळी न पडता त्वरित महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेशी संपर्क साधा. तुमचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.