बाणावली येथील बलात्कार प्रकरणी माझ्या विधानाचा माध्यमांतून विपर्यास करण्यात आला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला

पणजी, ३० जुलै (वार्ता.) – बाणावली येथील समुद्रकिनार्‍यावर बलात्कार झाल्याच्या प्रकरणी प्रसारमाध्यमांतून माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मी शासनाचा एक प्रमुख या नात्याने, तसेच एका १४ वर्षीय मुलीचा वडील या नात्याने बाणावली येथील घटनेवरून मला खूप दु:ख झाले आणि मी अस्वस्थ झालो होतो. मी कधीही प्रत्येकाला घटनेने दिलेली सुरक्षा देणार नसल्याचे विधान केलेले नाही, असा निर्वाळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

बाणावली येथील समुद्रकिनार्‍यावर उत्तररात्री ३ वाजता २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला होता. या प्रकरणी मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, ‘रात्रभर अल्पवयीन मुली समुद्रकिनार्‍यावर काय करतात ? पालकांनी अधिक दायित्वाने वागावे’, असे विधान केले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे हे विधान ‘एक आश्चर्यकारक विधान’ अशा अर्थाने प्रमुख राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरही झळकले, तसेच मुख्यमंत्र्यांवर सामाजिक माध्यमांतून टीका झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा निर्वाळा दिला.

ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यात संचारबंदी लागू आहे आणि सार्वजनिक ठिकाणी जाण्यास लोकांना प्रतिबंध आहे आणि यामुळे मी अल्पवयीन मुलींच्या दायित्वाविषयी बोललो ते प्रत्येक नागरिकाची काळजी असल्याने अन् त्यांच्या प्रेमापोटी बोललो आहे. बलात्कार प्रकरणी संशयितांना कह्यात घेण्यात आले आहे आणि दोषींवर कायद्याच्या आधारे कठोर कारवाई होणार आहे.’’