प्रामाणिक विद्यार्थ्यांची व्यथा !

काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. या निकालावर समाजातील बर्‍याच जणांकडून ‘हे तर फुकटचे गुण’, अशी प्रतिक्रिया उमटली. एकूण परीक्षापद्धती पहाता अशी शंका येणे रास्त असले, तरी सदोष परीक्षापद्धतीमुळे सरसकट सर्व विद्यार्थ्यांचे अवमूल्यन करायचे का ? कष्टाळू आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मनाला हे शब्द बोचणारे नव्हेत का ? यंदाचे गुण ९ वीच्या गुणांच्या आधारे देण्यात आले असले, तरी ९ वीच्या परीक्षेत कुणीच गांभीर्याने आणि मनापासून अभ्यास केला नाही, असे कसे म्हणता येईल ? त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘आयतोबा’ असे म्हणून घराघरांत चर्चा करणार्‍यांनी हे लक्षात घ्यायला हवे. काही जणांना १० वीचे वर्ष हे ‘करिअर’चा आरंभ समजले जाते. या परीक्षेनंतर उच्च शिक्षणाची दिशा ठरवली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास टिकणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सरसकट अशा पद्धतीने बोलल्यास आत्मविश्वास कसा टिकेल ? काही विद्यार्थी मनापासून अभ्यास करतात आणि प्रामाणिकपणे परीक्षा देतात; परंतु त्यांच्याच जोडीने शिकणारे काही विद्यार्थी ‘कॉपी’ करून पास होतात. काही जण आरक्षणाच्या कुबड्यांच्या आधारे ‘मेरिट’मध्ये कष्टाळू विद्यार्थ्यांवर मात करतात. हा सर्व प्रामाणिक विद्यार्थ्यांवरील अन्यायच आहे. यात भर म्हणजेच आता दळणवळण बंदीच्या काळातील परीक्षापद्धतींवरून केला जाणारा शिक्कामोर्तब !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

विषारी बी पेरल्यावर त्याचे मोठे झाड होऊन त्याला फांद्या फुटाव्यात, तशी सध्याच्या शिक्षणप्रणालीची स्थिती झाली आहे. १० वीच्या निकालानंतर निर्माण झालेले घोळ आणि समस्या ही या झाडाची एक फांदी म्हणता येईल. भारतात प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची कमतरता नाही. प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थीही पुष्कळ आहेत. एक ना अनेक कारणांनी भारताची विद्वत्ता विदेशात पोचते. त्यामुळे सरकारने या विषारी झाडाच्या फांद्या तोडायलाच हव्यात. पाश्चात्त्य आणि साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव असलेल्या शिक्षणपद्धतीची मुळे खोलवर रुतली आहेत. तिला खतपाणी घालणार्‍यांचाही सरकारने बंदोबस्त करायला हवा. प्रामाणिक विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करतांना प्रत्येक विद्यार्थी हा प्रामाणिकच असेल, असे चित्र निर्माण करायला हवे. विद्यार्थ्यांसाठीच्या ध्येयाच्या वाटा भारतीय शिक्षणप्रणालीत मिळतील, हे मात्र निश्चित !

– कु. प्राजक्ता धोतमल, फोंडा, गोवा.