‘रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाची मागणी
सातारा, ३० जुलै (वार्ता.) –‘ रेशनिंग’चे धान्य इतरत्र कुठे जाऊ नये, यासाठी त्याची वाहतूक करणार्या वाहनांना ‘जी.पी.आर्.एस्.’ प्रणाली बसवावी, असे शासकीय आदेश आहेत; मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अनेक वाहनांना ‘जी.पी.आर्.एस्.’ प्रणाली बसवण्यात आलेली नाही. अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे, ‘रेशनिंग’च्या धान्याची वाहतूक करणार्या वाहनांना ‘जी.पी.आर्.एस्.’ प्रणाली नसल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांच्या गोदामात शासकीय धान्य रिकामे केले जाते. तेथे पुन्हा वाहनांमध्ये निकृष्ट धान्य भरले जाते आणि गावोगावी तेच निकृष्ट धान्य वितरित केले जाते. असा घोटाळा करून संबंधित ठेकेदारांनी अफाट संपत्ती गोळा केली आहे. त्यांच्या संपत्तीचीही चौकशी होणे आवश्यक आहे.