वेदपाठशाळांना राजाश्रय हवा !

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख वेदपाठशाळेच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना ५०० भाजीपुरीची पाकिटे पाठवण्यात आली. कोणत्याही प्रकारचे भरघोस अनुदान, सोयी, सवलत नसतांनाही वेदपाठशाळा साहाय्याला पुढे येतात, यातून भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित होते. स्वार्थासाठी एकमेकांच्या जिवावर उठणार्‍यांना हे उदाहरण शिकण्यासारखे आहे.

देशाच्या चहूबाजूला आजही वेदाध्ययनाचे महत्त्व पटवून देण्याचे आणि वेदांचा वारसा पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वेदपाठशाळा करत आहेत. वर्ष १८३५ मध्ये लॉर्ड मेकॉलेने तत्कालीन इंग्रज संसदेत ‘येथील (भारतातील) लोकांचे उच्च विचार, नीतीमत्ता आणि गुण पहाता या लोकांवर आपण शासन करू शकू, असे मला वाटत नाही. या लोकांवर शासन करण्यासाठी आपल्याला त्यांच्या परंपरा, संस्कृती, शास्त्र आणि आध्यात्मिकता यांच्या एकत्वाने बनलेल्या कण्यावर आघात करावा लागेल’, असे मत मांडले. नीतीप्रधान भारतीय संस्कृती आणि समाज यांच्यातील ‘वेद’ हा महत्त्वाचा दुवा होता. दुर्दैवाने इंग्रज हा दुवा तोडण्याच्या प्रयत्नांत यशस्वी झाले आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण अनैतिकता बोकाळल्याच्या रूपाने पहातच आहोत. स्वातंत्र्यानंतर सर्वपक्षीय सरकारांकडूनही वेदपाठशाळांची उपेक्षाच केली गेली. वेदविद्या हा अमूल्य ठेवा असल्याने त्याचे जतन, संशोधन आणि प्रसार होणे आवश्यक आहे. आज विदेशातील अभ्यासक येऊन या विद्येवर संशोधन करत आहेत; मात्र आपल्याकडे या विद्येला दुर्लक्षित केले जात आहे.

पुणे येथील वेदाचार्य मोरेश्वर घैसास यांनी वेदपाठशाळांच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. ‘वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करणारे घनपाठी अन् प्राध्यापक दोन्ही समानच आहेत; परंतु अल्प मानधनामुळे घनपाठी पौरोहित्याकडे वळतात’, अशी खंत व्यक्त केली. तसेच त्यांनी ‘इतर अध्यापकांप्रमाणे त्यांनाही सर्व सुविधा आणि योजना लागू करणे आवश्यक आहे. अन्यथा तरुण पिढी वेदाध्ययनापासून दुरावण्याची शक्यता आहे’, असे मत व्यक्त केले आहे. जर मदरशांना अनुदान मिळते, तर प्राचीन ऋषिमुनींचा थोर वारसा जपणार्‍या वेदपाठशाळांनाही अनुदान मिळायला हवे. सरकारने यावर कृतीशील विचार करावा, हीच अपेक्षा !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे