अनेक भागांत एकाच दिवसात ३२ इंच पाऊस झाल्याने पूर ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोल्हापूर, २८ जुलै – अनेक भागांत एकाच दिवशी ३२ इंच पाऊस झाला. काही भागांमध्ये दोन दिवसांत ४९ इंच पाऊस पडला. यामुळे महापूर आला. कोल्हापुरात अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन अल्प आकाराच्या मोर्‍या आहेत. बर्‍याचदा गाळ, दगड किंवा झाडे वाहून आल्यामुळे या मोर्‍या बंद होतात. त्यामुळे आता पाईप मोर्‍यांऐवजी बॉक्स किंवा स्लॅबच्या मोर्‍या बांधल्या जातील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झाले असून त्यावर कारवाई करणार आहे. यात चालढकल किंवा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल.’’ (वर्ष २०१९ मध्ये झालेल्या महापुराच्या वेळीही याचप्रकारे नदीपात्रात अतिक्रमण झाल्याचे समोर आले होते; मात्र यानंतरही केवळ चर्चा होण्याच्या पलीकडे काहीच झाले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा करून थांबू नये, तर आता प्रत्यक्ष कृती करावी, हीच सामान्यांची अपेक्षा ! – संपादक)