ध्यानाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म वैशाख मासातच का झाला ?’, याविषयीचे गुपित समजणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ध्यानाच्या वेळी अकस्मात् कुणीतरी ‘तुला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म वैशाख मासात का झाला, हे ठाऊक आहे का ?’, असे विचारून अवतारत्वाचे गुपित उलगडून सांगणे

‘एकदा सकाळी मी ध्यानाला बसलो असतांना अकस्मात् मला सूक्ष्मातून कुणाचा तरी स्वर ऐकू आला. कुणीतरी मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म वैशाख मासातच का झाला, ते तुला ठाऊक आहे का ?’, असे विचारत होते. त्या वेळी मी त्यांना विनंतीच्या स्वरात म्हणालो, ‘नाही, मला ठाऊक नाही. मला समजेल, अशा भाषेत आपणच सांगता का ?’ तेव्हा त्यांनी भगवंताचे विविध अवतार, नारद, गंगा नदी, संत यांच्या गोष्टी सांगून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाचे गुपित उलगडून सांगितले.

२. नृसिंह अवताराप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीसुद्धा अनिष्ट शक्तींच्या त्रासापासून साधकांचे (भक्तांचे) रक्षण करणे

२ अ. भगवंत हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नृसिंह अवतारात प्रकटणे : ‘हिरण्यकश्यपू या राक्षसाने त्याचा पुत्र प्रल्हाद श्रीमन्नारायणाचा जप करत असल्याने त्याचा नानाविध प्रकारे छळ केला. हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाची भगवत्भक्ती खंडित होण्यासाठी त्याला जिवे मारण्याचे अनेक प्रकार करून पाहिले. त्याला मारण्यासाठी कधी त्याच्या अंगावर विषारी सर्प सोडले, कधी उंच कड्यावरून त्याला खाली फेकले, तर कधी उकळत्या तेलात टाकले; परंतु प्रत्येक वेळी भगवंताने भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. शेवटी कंटाळून हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणाला, ‘‘कुठे आहे तुझा देव ? मला दाखव.’’ तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाला, ‘‘भगवंत सर्वच ठिकाणी आहे. तो चराचरात व्यापून आहे.’’ तेव्हा क्रोधायमान झालेल्या हिरण्यकश्यपूने ‘‘येथे तुझा देव आहे का ?’’, असे म्हणत जवळच असलेल्या खांबावर लाथेने प्रहार केला. त्याच क्षणी त्या खांबातून नृसिंह अवतार घेऊन भगवान श्रीविष्णु प्रकट झाले. ‘हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवंताला नृसिंह अवतार धारण करावा लागला होता’, हे सर्वांना श्रुत आहे.’

२ आ. परात्पर गुरु डॉक्टर यांनी अनिष्ट शक्तींच्या त्रासाशी सूक्ष्मातून लढण्यासाठी साधकांना निरनिराळे नामजपादी उपाय सांगणे : ‘अनिष्ट शक्ती साधकांना विविध प्रकारे त्रास देत आहेत. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून अनिष्ट शक्तींशी लढत असतात. ते सूक्ष्मातून साधकांना कठीण प्रसंगात साहाय्य करून त्यांचे रक्षण करतात, तसेच अनिष्ट शक्तींच्या त्रासाशी लढण्यासाठी साधकांना निरनिराळे नामजपादी उपायही सांगतात. ते साधकांना अधिकाधिक वेळ नामजप, सत्सेवा करण्यास सांगतात. त्यामुळे सत्सेवेतील चैतन्याने त्यांना होणारे आध्यात्मिक त्रास उणावून त्यांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होईल. परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात,

स्थूल देहा असे स्थळकार्याची मर्यादा ।

कैसे असू सर्वदा सर्वा ठायी ।।

सनातन धर्म माझे नित्य रूप ।

त्या रूपे सर्वत्र आहे सदा ।।

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात भगवान परशुरामाप्रमाणे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असणे

३ अ. भगवान परशुरामाने ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांद्वारे दुष्टांचे निर्दालन करणे : भगवान परशुराम हे श्रीविष्णूचे सहावे अवतार समजले जातात. त्यांचे वर्णन करणारा एक श्लोक प्रसिद्ध आहे.

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।

इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

अर्थ : चार वेद मुखोद्गत आहेत (म्हणजे त्यांना संपूर्ण ज्ञान आहे) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (म्हणजे शौर्य आहे), म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही ज्ञात असल्याने शाप अन् शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो तो परशुराम, जो कुणी त्याला विरोध करील, त्याला (दुष्टांना) तो शापाने किंवा बाणाने पराजित करील.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून साधकांचे रक्षण होण्यासाठी यज्ञयाग करवून घेणे आणि साधकांना साधना शिकवून त्यांचे ब्राह्मतेज वाढवणे : परात्पर गुरु डॉक्टर अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून साधकांचे रक्षण होण्यासाठी यज्ञयाग करून देवतांना प्रसन्न करून देवतांचे साहाय्य आणि आशीर्वाद घेत आहेत. साधकांना साधना शिकवून समाजातील ब्राह्मतेज वाढवत आहेत. तसेच समाजातील अन्य संतांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे आज्ञापालन करून कृती करत आहेत. त्यामध्ये काही चूक झाल्यास प्रायश्चित्तही घेत आहेत.

४. विश्वभर भ्रमण करणार्‍या ब्रह्मर्षि नारदाप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विश्वभरातील साधकांना साधना सांगून त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष करण्यासाठी सर्वत्र सूक्ष्मातून भ्रमंती करणे

श्री. नंदकिशोर नारकर

ब्रह्मर्षि नारद सर्वत्र भ्रमंती करून सर्वत्रची सुख-दुःखे जाणून घेऊन वैकुंठात श्रीविष्णूला सांगतात. त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले अखिल ब्रह्मांडातील साधकांची मने सूक्ष्मातून जाणून घेत आहेत आणि साधकांना साधनेचा योग्य मार्ग दाखवून त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष होण्यासाठी सूक्ष्मातून विश्वभर संचार करतात.

५. हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या श्रीमद् आद्य शंकराचार्यांप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विविध माध्यमांतून हिंदु धर्माचा प्रसार करणे

श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी हिंदु धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी भारतभरात ४ पिठांची निर्मिती करून त्याद्वारे हिंदु धर्माचा प्रसार केला. त्या वेळी त्यांनी हिंदूंना विविध प्रकारे (स्तोत्र, अष्टके इत्यादी) लिखाण करून समाजाला मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सनातन संस्थेच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले अनेक आश्रम सिद्ध करत आहेत. ते विविध माध्यमांतून हिंदु धर्माचे आचार, विचार आणि संस्कार यांचा प्रसार करत आहेत. तसेच धर्मशिक्षण देऊन समाजजागृती करत आहेत. ते साधक आणि समाजातील व्यक्ती यांच्याकडून साधना करवून घेत आहेत.

६. जगदोद्धारासाठी पृथ्वीवर अवतरलेल्या गंगामातेप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व कर्तेपणा गुरूंना समर्पित करून शांत आणि निर्मळ रहाणे

गंगामाता जगद्धोधारासाठी पृथ्वीवर अवतरली. गंगानदीच्या प्रवाहात येणार्‍या सर्वांना ती शुचिर्भूत करून पापमुक्त करते आणि स्वतः नेहमी शांत आणि शीतल रहात सागराला जाऊन मिळते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी या संतांच्या हिंदु भूमीत जन्म घेतला आहे. त्यांनी साधकांना गुरुकृपायोगानुसार अष्टांगयोग साधना सांगितली आहे. त्यात ते ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती आणि भावजागृती’, यांद्वारे साधकांकडून साधना करवून घेत आहेत. साधकांना सात्त्विक बनवून त्यांची मोक्षाच्या दिशेने वाटचाल घडवून आणत आहेत. एवढे सर्व करूनही ‘मी काही केले नाही. माझ्या गुरूंनी केले’, असे म्हणत ते सर्व श्रेय आपल्या गुरुचरणी (प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी) समर्पित करतात. कर्ता आणि करविता तेच असूनही ते गंगामातेप्रमाणे शांत आणि निर्मळ आहेत.

७. वैशाख मासातील ‘कृष्ण’ पक्षात जन्मणारे श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीमहाविष्णुरूपात अवतार घेतला असल्याचे सप्तर्षींनी उघड करणे

ईश्वरनिर्मित केवळ साडेतीन मुहूर्त सांगितलेले आहेत; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या आश्रमांमध्ये प्रतिदिनच शुभमुहूर्त असतो. तेथे नेहमीच शुभ कार्य चालू असते.

श्रीविष्णूचे दोन अवतार नृसिंहावतार आणि भगवान परशुराम अवतार अन् श्रीमद् आद्य शंकराचार्य यांचा जन्म याच मासामध्ये झालेला आहे. ब्रह्मर्षि नारद यांचा जन्म आणि गंगामातेची उत्पत्तीही याच मासामध्ये झालेली आहे. त्याचप्रमाणे सनातन संस्थेला सर्वतोपरी साहाय्य करणारे महान योगी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्यासारखे तपस्वीही याच मासात जन्मले.

असे ‘अवतार, ज्ञानयोगी आणि कर्मयोगी’, यांचा असा जन्म वैशाख मासांमधील असला, तरी हे सर्व वैशाख मासातील ‘शुक्ल पक्षातील’ आहेत, तर श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म ‘कृष्ण पक्षातील’ आहे. (म्हणजे ते श्रीकृष्ण आहेत.) सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीमहाविष्णुरूपात अवतार घेतला आहे’, हे सर्वांना सांगितले आहे.

 ८. कृतज्ञता

‘हे श्रीकृष्णा, हे अवतारी देवा, परम पूज्य आपणच हे सर्व सुचवून माझ्याकडून लिहून घेतलेत. याविषयी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– आपल्या चरणांखालील धूलीकण,

श्री. नंदकिशोर दत्तात्रेय नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.