पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेतली !

  • हे भारताला लज्जास्पद ! पाकला धडा शिकवून पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात आणणारे कणखर शासनकर्ते हवेत !
  • कुठे अटकेपार झेंडा फडकावणारे मराठे, तर कुठे स्वतःचाच भूभाग असलेला पाकव्याप्त काश्मीरही कह्यात घेऊ न शकलेले स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील सर्वपक्षीय शासनकर्ते !

इस्लामाबाद – भारताचा विरोध डावलून पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये २५ जुलै या दिवशी विधानसभेची निवडणूक घेतली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण ५३ जागांसाठी तब्बल ७०० उमेदवार रिंगणात होते. ५३ जागांपैकी ४५ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. उर्वरित ५ जागा महिलांसाठी, तर ३ जागा वैज्ञानिकांसाठी राखीव आहेत. या निवडणुकीत ३२ लाख मतदार मतदानाचा अधिकार बजावू शकतात, असे पाकने म्हटले आहे.

१. मागील वर्षी पाककडून गिलगिट आणि बाल्तिस्तान येथे घेण्यात आलेल्या निवडणुकीला भारताने विरोध दर्शवत ‘सैन्याच्या अधिपत्याखाली असलेल्या क्षेत्राची स्थिती पालटणे, हा कायदेशीर अधिकार नाही’, असे म्हटले होते.

२. या निवडणुकीत पाकमधील सत्ताधारी ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ या पक्षासह ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ आणि ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ यांच्यात मुख्य लढत असेल. पाकने नुकत्याच बंदी घातलेल्या ‘तहरीक-ए-लबैक पाकिस्तान’ या कट्टर जिहादी संघटनेकडूनही ४० जागांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये यापूर्वी वर्ष २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. त्यात तेव्हाच्या सत्ताधारी असलेल्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ पक्षाचा विजय झाला होता.