नांदेड – जिल्ह्यात ८० पैकी २४ महसूल मंडळांत अतीवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील नदी आणि नाले यांना पूर आला आहे. गोदावरी आणि पैनगंगा नद्यांसह जिल्ह्यातील नदी-नाले यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो हेक्टर शेतभूमीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील पुलावरून पाणी वहात असल्याने काही काळासाठी संपर्क तुटला होता. पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. पैनगंगा नदीकाठावरील ठिकाणच्या परिसरातील शेती पिकांची हानी झाली आहे. हिमायतनगर तालुक्यातील जवळगावला पुराने वेढले आहे. तेथील शेकडो एकर शेतीची प्रचंड हानी झाली आहे, तर गावातील काही घरांत पाणी शिरले असून अनेक घरांना पुराचा वेढा आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.