मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ‘रेड अलर्ट’ घोषित !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे १९ ते २३ जुलै या कालावधीत मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि मध्य महाराष्ट्र येथील काही भागांत ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भ येथील काही भागांमध्ये ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. नेरळ-माथेरान या घाटरस्त्यात दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे माथेरान येथे गेलेले पर्यटक अडकून पडले. पावसाचा वेग अल्प झाल्यावर पर्यटकांना बाहेर काढण्यात आले.

मुंबई

मुंबईत पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम लोकल रेल्वे वाहतूक सकाळच्या कालावधीत काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती, तसेच लांब पल्ल्याच्या काही रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या. मुंबईसह उपनगरांतील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही काही काळासाठी ठप्प होती.

भांडुप येथील जलशुद्धीकेंद्रात शिरलेले पाणी प्रशासनाने बाहेर काढले असून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत् करण्यात आला. कांदिवली येथील मुंबई महानगरपालिकेच्या ठाकूर कॉम्प्लेक्समधील चारचाकी वाहनांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले. तेथे ४०० वाहने होती. नवी मुंबईतील सीबीडी भागातील डोंगरावर लहान मुलांसह फिरण्यासाठी गेलेले नागरिक तेथील ओढ्याला आलेल्या पुरामुळे डोंगरावरच अडकले. या वेळी अग्निशमनदलाच्या सैनिकांनी मानवी साखळी करून ३५० नागरिकांची सुटका केली. वरळी येथील जीर्ण झालेल्या बीडीडी चाळींच्या छतावर पाणी साचून वरच्या मजल्यावरून जिन्याने धबधब्याप्रमाणे तळमजल्यावर पावसाचे पाणी येत होते. बीडीडी चाळीतील अनेक खोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

ठाणे

कळवा येथील घोळाईनगर येथे दरड कोसळल्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शिळफाटा परिसरात पाणी साचल्यामुळे मुंब्रा-पनवेल महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कसारा घाटात रेल्वे रुळांवर दरड कोसळल्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली होती. मलबा बाजूला केल्यावर वाहतूक चालू करण्यात आली. शहरात भिंत आणि झाडे पडून १४ वाहनांची हानी झाली. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. पाण्याच्या प्रवाहासह एक जण वाहून गेला. भिवंडी तालुक्यातील पिसे परिसरात होणार्‍या अतीवृष्टीमुळे पिसे धरण भरले.

कल्याण वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवले. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात ३ फूट पाणी साचले होते. अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयात पाणी शिरल्याने कर्मचार्‍यांची धावपळ झाली. काही कार्यालयांमधील महत्त्वाच्या धारिका भिजल्या, तर भांडार विभागातील अनेक सामान पाण्याखाली गेले आहे.