सिंधुदुर्ग – जिल्ह्यात पावसाची संततधार चालू असून मुसळधार पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक चालू आहे. यापूर्वी करूळ घाटातील मार्गाचा काही भाग कोसळला असल्याने हा मार्ग दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक वाढल्याने भुईबावडा घाटात रिंगेवाडीपासून ३ – ४ कि.मी. अंतरावर रस्ता खचत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बगल मार्गावर भरावाची माती अतीवृष्टीमुळे बाहेर येत असल्याने मळगाव, कुंभारवाडी येथील रस्त्यावर चिखल साठून हा रस्ता धोकादायक बनला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून वाहतूक करणे कठीण होत आहे.