आषाढ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

आषाढ मासातील (१८.७.२०२१ ते २४.७.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘११.७.२०२१ या दिवसापासून आषाढ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, ग्रीष्मऋतू, आषाढ मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

सौ. प्राजक्ता जोशी

२ अ. मन्वादि : आषाढ शुक्ल दशमी (१९.७.२०२१) आणि आषाढ पौर्णिमा या तिथींना (२३.७.२०२१) ‘मन्वादि योग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे.

२ आ. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर ‘दग्ध योग’ होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. १९.७.२०२१ या दिवशी सोमवार असून रात्री १० पासून दुसर्‍या दिवशी सूर्याेदयापर्यंत ‘दग्ध योग’ आहे.

२ इ. यमघंट योग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. प्रवासासाठी या योग पूर्णतः वर्ज्य करावा. सोमवारी १९.७.२०२१ या दिवशी सूर्याेदयापासून रात्री १०.२७ पर्यंत विशाखा नक्षत्र असल्याने ‘यमघंट योग’ आहे, तसेच बुधवारी २१.७.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.३० पासून दुसर्‍या दिवशी सूर्याेदयापर्यंत मूळ नक्षत्र असल्याने ‘यमघंट योग’ आहे.

२ ई. चातुर्मासारंभ : ‘आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतच्या चार मासांच्या (महिन्यांच्या) काळाला ‘चातुर्मास’ म्हणतात. यामध्ये श्रावण, भाद्रपद, आश्विन यांपैकी एका मासात अधिकमास आल्यास चातुर्मास पाच मासांचा होतो. आषाढ शुक्ल एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ होतो. शयनी एकादशीपासून देव झोपतात आणि कार्तिक एकादशीला (प्रबोधिनी एकादशीला) देव जागे होतात. या काळात असुर प्रबळ होतात. त्यामुळे या काळात धर्मशास्त्र अनेक व्रते करण्यास सांगते. यातील धार्मिक भाग सोडला, तर निसर्गाप्रमाणे हे चारही मास पर्जन्याचे असतात. या काळात निरनिराळे रोग होतात, तसेच पचनशक्ती न्यून होते. त्यामुळेच या काळात उपवास आणि व्रते करण्यास सांगितली आहेत. येथे ‘असुर’चा अर्थ ‘रोग किंवा अनारोग्य’ असा घेण्यास हरकत नाही. आपल्या धर्मशास्त्रात सर्व गोष्टी आरोग्य आणि हित यांसाठीच सांगितल्या आहेत. याचा विचार करणे आवश्यक आहे.’ (संदर्भ ग्रंथ : २१ व्या शतकातील कालसुसंगत आचारधर्म, प्रकाशक : श्री. अनंत (मोहन) धुंडीराज दाते)

२ उ. शयनी एकादशी : आषाढ शुक्ल पक्ष एकादशीला ‘शयनी एकादशी’ म्हणतात. २०.७.२०२१ या दिवशी शयनी एकादशी आहे. या दिवशी ‘श्रीधर’ या नावाने भगवान श्रीविष्णूचे पूजन करून तुपाचा दिवा लावतात, तसेच एकादशी माहात्म्य आणि श्रीविष्णुसहस्रनाम यांचे वाचन करतात.

२ ऊ. पंढरपूर यात्रा : आषाढ शुक्ल एकादशीला पंढरपूर येथे यात्रा असते. आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून अनेक भाविक ‘विठ्ठल’नामाचा गजर करत पायी चालत पंढरपूरला जातात. चंद्रभागा नदीत स्नान करून ते श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात.

या दिवशी पंढरपूरला शेगाव येथून संत श्री गजानन महाराज यांची, आळंदी येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची, देहू येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ यांची, पैठण येथून संत एकनाथ महाराज यांची आणि उत्तर भारतातून संत कबीर यांची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे.

२ ए. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. २०.७.२०२१ या दिवशी सकाळी ८.४० पासून सायंकाळी ७.१८ पर्यंत विष्टी करण आहे.

२ ऐ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २०.७.२०२१ या दिवशी रात्री ८.३३ पासून २१.७.२०२१ या दिवशी सायंकाळी ४.२७ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ ओ. सौम्यवार प्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. बुधवारी येणार्‍या प्रदोष तिथीला ‘बुधप्रदोष’ किंवा ‘सौम्यवार प्रदोष’ म्हणतात. २१.७.२०२१ या दिवशी बुधप्रदोष आहे. शिक्षण, ज्ञानप्राप्ती आणि मनोकामना यांच्या पूर्तीसाठी ‘सौम्यवार प्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. गतजन्मी केलेल्या पापामुळे लागलेल्या विविध प्रकारच्या दोषांचे निवारण करण्यासाठी, तसेच भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सायंकाळी हे व्रत करतात. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे. शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.

२ औ. वामन पूजन : आषाढ शुक्ल द्वादशीला वामनावताराचे यथाविधी पूजन केल्यास यज्ञासमान फळ मिळते. २१.७.२०२१ या दिवशी वामन पूजन करावे.

२ अं. शाक-गोपद्मव्रतारंभ : आषाढ शुक्ल द्वादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चार मास प्रतिदिन हे व्रत करतात. पहाटे स्नान करून देवघरात किंवा तुळशीपुढे ३३ गोपद्मे काढून त्यांची पूजा करतात.

२ क. महाराष्ट्रीय बेंदूर : महाराष्ट्रीय ‘बेंदूर’ हा ‘बैलांचा सण’ म्हणून साजरा करतात. काही ठिकाणी या सणाला ‘पोळा’ असे म्हणतात. या वर्षी २२.७.२०२१ या दिवशी महाराष्ट्रीय बेंदूर साजरा करण्यात येणार आहे.

२ ख. सिंहायन : २२.७.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.५६ नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्चात्त्य पद्धतीनुसार) सिंह राशीत प्रवेश करत आहे.

२ ग. गुरुपौर्णिमा आणि व्यासपूजा : आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतात. या दिवशी गुरु आणि महर्षि व्यास यांची पूजा करतात. सूर्याेदयापासून सहा घटिका असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करावी. २३.७.२०२१ या दिवशी सकाळी १०.४४ पासून दुसर्‍या दिवशी सकाळी ८.०७ पर्यंत पौर्णिमा आहे.

२ घ. सन्यासिनां चातुर्मास्यारंभ : आषाढ पौर्णिमेला संन्यासव्रत घेतलेल्यांचा चातुर्मास चालू होतो. व्यासपूजन करून संन्यासी एकाच ठिकाणी दोन मास वास्तव्य करतात.

टीप १ : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.

टीप २ : एकादशी, क्षयतिथी दिन, घबाड मुहूर्त, दग्ध योग, भद्रा (विष्टी करण), प्रदोष, कुलधर्म, यमघंट आणि अन्वाधान यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

टीप ३ : पृष्ठ ४ वर दिलेल्या सारणीतील शुभ आणि अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.

१. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ।। – संत एकनाथ

अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.

२. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ।। – संत तुकाराम

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’

ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (११.७.२०२१)