सावंतवाडी येथील ‘शिवउद्यान आणि ‘हेल्थ पार्क’ यांच्या कामातील भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी फेटाळले

सावंतवाडी – नगराध्यक्ष संजू परब यांनी शहरातील ‘शिवउद्यान आणि ‘हेल्थ पार्क’ यांच्या कामात भ्रष्टाचार झाला असून त्याला मी उत्तरदायी असल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. पैसे खाण्याची सवय मला नाही. कोण पैसे खात आहे ? याची माहिती परब यांनी करून घ्यावी, असे सांगत माजी पालकमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नगराध्यक्ष परब यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ‘शहरात पाणपोईच्या कामात झालेल्या ९ लाख रुपयांच्या भ्रष्टाचारावर नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे प्रतीआव्हान आमदार केसरकर यांनी दिले आहे.

‘चांदा ते बांदा’ योजनेतून शहरातील ‘शिवउद्यान आणि ‘हेल्थ पार्क’ येथे झालेल्या कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याला आमदार केसरकर आणि तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर हेच उत्तरदायी आहेत, असा आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी ९ जुलै या दिवशी केला होता. याविषयी स्वतःची भूमिका स्पष्ट करतांना आमदार केसरकर पुढे म्हणाले, ‘‘या दोन विकासकामांसाठी भूमी घेण्यासाठी नगरपरिषदेला निधी देऊनही नगरपरिषदेने अद्याप भूमी कह्यात घेतलेल्या नाहीत. तौक्ते चक्रीवादळाची पूर्वकल्पना देऊनही सावंतवाडीतील नाट्यगृहाचे छप्पर उघडे करून ठेवण्यात आले होते. भ्रष्टाचाराच्या प्रकरणी कुणाकडेही माझ्याविषयी तक्रार करावी. शहराच्या विकासासाठी मी नेहमी काम करणार आहे. सावंतवाडी शहर स्वच्छ, सुंदर रहाण्यासह भ्रष्टाचारमुक्त रहाणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही स्वायत्त संस्था असून काम दिल्यानंतर ते योग्यरित्या होते कि नाही ? हे पहाणे त्या भागातील स्वायत्त संस्थेचे दायित्व आहे.’’