बालकांना आहार देतांना पुढील सूत्रे लक्षात ठेवा !

वैद्य अंकुर देशपांडे

१. लहान मुलांना आहार किती आणि कोणता द्यावा ? अशी विशिष्ट सारणी करता येत नाही; कारण प्रत्येक मुलाची आहार पचवण्याची क्षमता, शारीरिक आवश्यकता अन् प्रकृती वेगळी असते. त्यामुळे मुलांना घरचा ताजा; परंतु पचायला हलका असा आहार द्यावा. लहान मुले कमी खातात म्हणून त्यांना बळजोरीने भरवण्याचा प्रयत्न करू नये.

२. मलप्रवृत्तीनंतर चांगली भूक लागल्यावर दिलेला आहार व्यवस्थित पचून अंगाला लागतो. अंगाला लागलेले जेवण, हीच एका अर्थाने प्रतिकारक्षमता (इम्युनिटी) असते ! त्यामुळे मुलांना मलप्रवर्तन झाल्यानंतर जेवढी भूक आहे, तेवढाच आहार द्यावा. मलप्रवृत्ती होणे आणि भूक लागणे म्हणजे पचन व्यवस्थित होत असल्याचे लक्षण आहे.

३. आजारपणात बालकाचे बळ वाढावे, याकरता आहारात भरपूर फळे, भाज्या, इम्युनिटी बूस्टर, काढे यांचा भडिमार न करता बालकाला पचेल आणि त्याला सोसेल इतकाच आहार देणे अपेक्षित आहे. किंबहुना तितकाच आहार द्यायला हवा; कारण भरपूर खाल्लेले शरिरात पचत नसेल, शोषले जात नसेल आणि मल बाहेर पडत नसेल, तर अशा आहाराचा काय उपयोग ? उलट अशा अनावश्यक आहारामुळे कफ-मेद यांची वाढ होऊन कफाचे विकार मात्र निश्चितच होणार.

४. बालक सुदृढ नसेल आणि तुम्हाला हवे तसे गुटगुटीत नसेल, तर त्याच्यावर आहाराचा डोंगर उभा करण्यापेक्षा कारणांचा शोध घेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा. बाळ गुटगुटीत व्हावे म्हणून भरपूर आहार हा अनारोग्यकरच ! सगळ्या बालकांचा आहार सारखा नसतो. स्थुल बालकांना अजून पोषणाची नाही, तर त्यांना समतोल आहार आणि व्यायाम यांची आवश्यकता असते.

५. दूध देतांना शक्यतो रात्रीच्या वेळी देणे टाळावे. रात्री झोपण्यापूर्वी दिलेले दूध कफ निर्माण करते. रात्री अगदी भूक लागल्यास लाह्यांचे (साळी, राजगीरा, ज्वारी) पीठ तूपावर परतून त्यात पाणी आणि गुळ घालून शिजवून अन् पातळसर करून पिण्यास द्यावे.

६. दूध हे मूळ चवीसह प्यायला हवे, तरच त्याचे लाभ दिसतात. आयुर्वेदाने दुधाचे गुणवर्णन केले आहेत. दूध पिल्यानंतर पोट फुगणे, पोटात दुखणे, शौचास सारखे जावे लागणे, अशी लक्षणे नसतील, तर दूध योग्य प्रकारे पचत आहे, असे समजू शकतो. अशा प्रमाणात प्यायलेले दूध रसायनाप्रमाणे कार्य करते. त्यामुळे मुलांची आणि सर्व वयोगटाची प्रतिकारक्षमता वाढते. दुधाची चव आवडत नाही म्हणून मुलांना दुधात ‘बोर्नव्हिटा’, ‘कॉम्प्लान’, ‘मायलो’, ‘बूस्ट’ यांसारखे पदार्थ घालून दूध दिल्यास त्याचे अपायच अधिक बघायला मिळतात. अगदीच आवश्यकता वाटल्यास दुधामध्ये केशर, वेलची, हळद, विडंग आणि सुंठ यांसारखे पदार्थ घालून द्यायला हरकत नाही.

– वैद्य अंकुर देशपांडे, एम्.डी.(आयुर्वेद), आरोग्य मंदिर, सांगली-पुणे

(‘फेसबूक’वरून साभार)