गुरुकार्याचा ध्यास आणि गुरूंवर अतीव श्रद्धा असलेल्या अन् सर्वांशी जवळीक साधणार्‍या पू. (सौ.) संगीता महादेव पाटील !

पू. (सौ.) संगीता पाटील

१. जवळीक साधणे

अ. ‘सौ. संगीता पाटीलकाकूंनी समाजातील व्यक्तींना चांगल्या प्रकारे जोडून ठेवले आहे. त्यांना काकू बरेच दिवस दिसल्या नाहीत, तर त्या व्यक्ती काकूंची विचारपूस करतात. ते काकूंना ‘हवे-नको’ ते विचारतात.

आ. सौ. पाटीलकाकू किंवा श्री. पाटीलकाका रुग्णाईत असल्यास बरेच जण काकूंसाठी स्वतःच्या घरातील सामान (साखर, गहू, तांदूळ इत्यादी) नेऊन देतात. सर्वांना काकूंची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे ठाऊक आहे.

इ. सौ. काकू सेवेनिमित्त बाहेर गेल्यावर समाजातील व्यक्ती त्यांना घरी बोलावून त्यांचे आदरातिथ्य करतात. बरेच वाचक आणि हितचिंतक त्यांच्या घरातील शुभ प्रसंगी काकूंना घरी बोलावतात. ते काकूंना साडी-चोळी देऊन त्यांचा सन्मानही करतात.

ई. सौ. काकूंच्या संपर्कात असलेले परिसरातील राजकारणी आणि प्रतिष्ठित व्यक्तीही काकूंचा आदर करतात. ते काकूंना साहाय्य करतात आणि सनातनच्या कार्यासाठी अर्पण देतात.

२. प्रेमभाव

अ. सौ. पाटीलकाकूंची आर्थिक स्थिती साधारण असूनही काकू त्यांच्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी खाऊ देतात.

आ. एखादा साधक रुग्णाईत किंवा अडचणीत असल्यास सौ. पाटीलकाकू त्याला ‘हवे – नको’ ते विचारतात. प्रसंगी त्यांची त्या साधकाच्या घरातील कामे करण्याचीही सिद्धता असते.

३. गुरुकार्याचा ध्यास

अ. जेव्हापासून सौ. पाटीलकाकूंना दृष्टी आली, तेव्हापासून काकूंनी लगेच समष्टी साधनेला आरंभ केला. त्या या वयातही तरुणांना लाजवेल, अशी सेवा करतात. त्या कोणत्याही सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांची सेवेसाठी कोठेही जाण्याची सिद्धता असते.

आ. ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी लागणारे पटल, आसंदी असे अवजड साहित्य नेण्यासाठी साधकांचे नियोजन झाले नाही, तर काकू स्वतःच ते साहित्य प्रदर्शनाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. ‘ग्रंथप्रदर्शन वेळेत आणि परिपूर्ण लागले पाहिजे’, असा त्यांना ध्यास असतो.

इ. सौ. काकू चालत जाऊन दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांचे वितरण करतात. ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकांच्या वेळी काकू मोठ्या संख्येने (३०० ते ४००) अंक वितरण करतात. काकू रुग्णाईत असल्यास वाचक काकूंच्या घरी येऊन दैनिक किंवा साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ घेऊन जातात. काकू रुग्णाईत असतांना नियतकालिकांचे वितरण करत असतील, तर वाचक काकूंना म्हणतात, ‘‘तुम्ही कशाला आलात ? आम्ही ते घ्यायला तुमच्याकडे आलो असतो.’’

ई. सौ. काकू वाचक आणि हितचिंतक यांच्याकडून अर्पण घेतात. काकू काही वाचकांकडे जाऊ न शकल्यास ते वाचक काकूंच्या घरी येऊन अर्पण देतात. त्या गुरुपौर्णिमा आणि हिंदु राष्ट्रजागृती सभा या वेळी मोठ्या प्रमाणात अर्पण मिळवतात.

उ. महाशिवरात्र, श्रीरामनवमी आणि श्री गणेश जयंती यांसारख्या उत्सवांच्या वेळी काकू त्या त्या देवतांच्या मंदिरांच्या अध्यक्षांना भेटून त्यांना सनातनचे लघुग्रंथ घेण्यासाठी प्रवृत्त करतात.

ऊ. वाचक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या वेळी सौ. पाटील काकू स्वतः चालत जाऊन घरोघरी जाऊन निमंत्रण देतात. त्या वेळी ‘अधिकाधिक संख्येने वाचक कसे उपस्थित रहातील ?’, असा त्यांना ध्यास लागलेला असतो.

ए. सनातन पंचांगांच्या वितरणासाठी आणि प्रायोजकत्वासाठी त्या नेहमी इतरांना उद्युक्त करत असतात. प्रत्येक वर्षी काकूंकडून १०० ते २०० पंचांगांचे वितरण होते.

ऐ. जेव्हा काकू विज्ञापने आणण्यासाठी जातात, तेव्हा नेहमीचे विज्ञापनदाते स्वत:हून विज्ञापने देतात.

ओ. जेव्हा आमच्या परिसरात धर्मरथाचे नियोजन असते, तेव्हा सौ. पाटीलकाकू ‘रथावरील साधकांच्या प्रसादाचे आणि महाप्रसादाचे नियोजन कसे होईल ? कोण अर्पण देईल का ?’, यादृष्टीने प्रयत्न करतात.

४. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

काकूंनी साधनेला आरंभ केल्यापासून त्यांना एखाद्या व्यक्तीच्या घरी गेल्यावर तेथील स्पंदने जाणवतात. त्यांनी बर्‍याच जणांना ‘पुढे २ – ३ दिवसांत काय होणार आहे ?’, ते सांगितले आणि नंतर त्याप्रमाणेच घडले.

५. परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लाभलेला सत्संग

सौ. पाटीलकाकूंची ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांना कृपाशीर्वाद दिला, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांसारखे गुरुदेव भेटले, हे तुमचे भाग्य आहे. परात्पर गुरुदेव ‘अनाथांची माय’ आहेत. त्यांच्याजवळ जाण्यासाठी तुमच्यात जे अवगुण आहेत, ते काढून टाका.’’

६. स्वतःला पालटण्याची तळमळ

सौ. काकूंमध्ये ‘प्रतिमा जोपासणे आणि साधकांविषयी पूर्वग्रह असणे’, हे स्वभावदोष होते. हे स्वभावदोष दूर करण्यासाठी त्या सतत देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करत. स्वतःकडून अयोग्य कृती झाल्यास किंवा मनात अयोग्य विचार आल्यास ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करणे, चूक झाल्यास लगेच क्षमायाचना करणे, अशा कृतींमुळे काकूंचे स्वभावदोष न्यून झाले.

 ७. काकूंना स्वतःत जाणवलेले पालट

नोव्हेंबर २०१८ पासून काकूंना ‘स्वतःतील प्रेमभाव आणि कृतज्ञताभाव यांत वृद्धी झाली आहे. साधकांविषयीचे पूर्वग्रह दूर होऊन सर्वांप्रती आदर वाटू लागला आहे’, असे जाणवत होते. गेल्या २ – ३ मासांपासून त्यांना त्यांची प्रगती झाल्याचे जाणवत आहे.

८. भाव

काकू प्रत्येक शनिवारी परिसरातील हनुमानाचे मंदिर धुऊन स्वच्छ करतात. त्या मंदिराचा परिसरही स्वच्छ करतात.

९. अनुभूती

अ.  काकूंना नामजपामुळे आणि सेवेमुळे दृष्टी आली. तेव्हापासून त्यांची अध्यात्मावर श्रद्धा बसली.

आ. त्यांना सेवा करतांना सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर दिसतात.

इ. त्यांना सेवा करतांना हलकेपणा जाणवतो.

ई. त्यांना बर्‍याच वेळा ‘घरात प.पू. भक्तराज खंजिरी घेऊन भजन म्हणत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसते.

परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेने मला सौ. पाटीलकाकूंच्या समवेत सेवेची संधी मिळाली. त्यासाठी मी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे. ‘आम्हा सर्व साधकांची काकूंप्रमाणे सेवा आणि साधना करण्याची तळमळ वाढू दे. सर्वांची साधनेत प्रगती होऊ दे’, हीच परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना !’

(हे लिखाण सौ. संगीता पाटील या संतपदी विराजमान होण्याच्या आधी केले असल्याने या धारिकेत त्यांचा ‘पू.’ असा उल्लेख केला नाही. – संकलक)

– गुरुसेवक, श्री. योगेश सुभेदार, भोसरी, पुणे. (२०.३.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक