पाश्चिमात्य विचारसरणीचे उदात्तीकरण करणार्यांचा म्हणजेच पुरो(अधो)गाम्यांचा महत्त्वाचा गड मानले जाणारे अमेरिकेतील वॉशिंग्टन शहर ! येथील ‘प्यू रिसर्च सेंटर’ या प्रसिद्ध अशासकीय संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतासंदर्भात सादर करण्यात आलेला हा अहवाल विविधांगी विषयांवर प्रकाश टाकतो. या अहवालातून भारतियांचे धर्म आणि त्या दृष्टीकोनातून आहाराच्या पद्धती, शाकाहारी आणि मांसाहारी आहार असण्याचे प्रमाण, उपवास करणे, पेहराव, टिळा आणि कुंकू लावण्याचे हिंदूंमधील प्रमाण, धर्मशिक्षण घेण्यासंदर्भातील पद्धती, दान-धर्म करण्याची वृत्ती, तीर्थयात्रा अथवा मंदिरांत जाण्यासारखे धर्माच्या संदर्भातील आचरण, विविध प्रकारे साधना करण्याचे प्रमाण, ‘तिहेरी तलाक’विषयी भारतियांचे मत, जातीआधारित भेदभाव, धर्मांतर, राजकीय विचारसरणी आदी विविध विषय अत्यंत विस्तृत अन् बारकाईने हाताळण्यात आले आहेत. अहवालात सादर करण्यात आलेली माहिती ही देशातील बहुतेक राज्ये आणि सर्व केंद्रशासित प्रदेश येथील ३० सहस्र लोकांना विविध प्रकारचे प्रश्न विचारून अन् त्यातून मिळालेल्या उत्तरांतून संकलित करण्यात आली आहे. सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमे यांतून सध्या यावर बरीच चर्चा होत आहे.
ख्रिस्त्यांच्या मतांवर डोळा !
जोनाथन इव्हान्स आणि नेहा सेहगल यांनी सिद्ध केलेल्या या अहवालाचा राष्ट्र अन् हिंदु धर्म यांच्या दृष्टीकोनातून अभ्यास केल्यास त्यातून अनेक तथ्ये बाहेर येतात. अहवालातील आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक धर्मांतर हिंदूंचे झाले आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण पहाता असे असणे स्वाभाविक आहे. तरीही हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची टक्केवारी सर्वाधिक आहे. त्यातही यातील ७४ टक्के धर्मांतरित हिंदू एकट्या दक्षिण भारतातील राज्यांमधील आहेत. गेल्या दोन दशकांत आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांचा विचार करता ती ख्रिस्त्यांसाठी माहेरघर बनली आहेत. काँग्रेसचा राजाश्रय लाभलेल्या या राज्यांत अनेक दलित आणि अन्य मागासवर्गीय हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. दलित म्हणून मिळणार्या शासकीय सुविधांपासून मुकू नये, यासाठी हे धर्मांतरित हिंदू कागदोपत्री स्वतःचा धर्म पालटत नाहीत आणि वर्षानुवर्षे सुविधांचा लाभ उपभोगत आले आहेत. नुकतेच तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी तिजोरीतून राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबाला १० लाख रुपये देणार असल्याचे घोषित केले. राजधानी देहलीतील ‘सेंट्रल विस्टा’च्या (संसदभवनाच्या नूतन इमारतीच्या) बांधकामावर होत असलेल्या अवाढव्य खर्चाला विरोध करणारे धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्ष तेलंगाणा सरकार करत असलेला सहस्रो कोटी रुपयांच्या व्ययाविषयी मात्र चकार शब्दही बोलत नाहीत, हे येथे लक्षात येते. तेलंगाणातील किती दलित कुटुंबे खरेच दलित आहेत आणि किती धर्मांतरित झाले आहेत ? हा प्रश्नही अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘प्यू’ची आकडेवारी पहाता यातील बहुतेक लोक ख्रिस्ती असल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तसेच के. चंद्रशेखर राव यांच्या लांगूलचालनाचा राजकीय इतिहास पहाता त्यांना हिंदु दलितांचा उमाळा आहे कि दलितांच्या आडून ख्रिस्त्यांच्या मतांवर डोळा आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
‘हिंदु राष्ट्रवादीं’ची व्यापकता !
‘प्यू’ने तीच्या अहवालात ‘कट्टर हिंदु राष्ट्रवादी’ विचारसरणी असलेल्या म्हणजेच हिंदुत्वाच्या विचारसरणीकडे कल असलेल्या भारतियांचाही अभ्यास केला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार दोन-तृतियांश हिंदूंचे मत आहे की, खर्या अर्थाने भारतीय बनण्यासाठी ‘हिंदू’ असणे आवश्यक आहे. त्यातील ८० टक्के हिंदू असेही मानतात की, भारतीय होण्यासाठी हिंदी भाषा येणेही बंधनकारक आहे, अर्थात् दक्षिण भारतात या दुसर्या निकषाविषयी निश्चितच वेगळे मत असू शकेल; परंतु हिंदू असणे आणि हिंदी भाषा येत असणे अशा गटातील हिंदूंना असेही वाटते की, भारतातील धार्मिक वैविध्य हे भारताचे बलस्थान आहे. थोडक्यात हिंदुत्वनिष्ठ विचारसरणी बाळगणारे हिंदू हे अन्य धर्मियांच्या प्रथा-परंपरा, सण-उत्सव यांचा आदर करतात, हेच यातून स्पष्ट होते. ‘प्यू’च्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘हिंदु राष्ट्रवादी’ हे व्यापक विचारांचे असल्याचे लक्षात येते. हिंदूंना नेहमी ‘कूपमंडूक वृत्ती असलेले’ अथवा ‘अन्य धर्मियांवर अत्याचार करणारे ‘सैतान’ (सनातनी)’ म्हणून हिणवणारी पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे, उदारमतवादी आणि साम्यवादी विचारवंत आदी मंडळींसाठी ही चपराक आहे, हे येथे आवर्जून सांगावेसे वाटते.
हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार करता जवळपास तीन-चतुर्थांश हिंदूंना वाटते की, गोमांस खाणारा हा ‘हिंदू’ असू शकत नाही. हिंदूंचा बुद्धीभेद करणारी मंडळी मात्र ‘गरीब हिंदूंचे भोजन हे गोमांसावर आधारित असल्या’चे नेहमीच बोलत असतात. ‘प्यू’च्या आकडेवारीतून या मंडळींचा खोटेपणा उघड होतो.
जागतिक मापदंडांचा विचार करता भारतीय संस्कृती इतर संस्कृतींपेक्षा श्रेष्ठ आहे, असे बहुतेक भारतियांचे मत आहे. यात ८५ टक्के मुसलमानांचाही समावेश आहे, हे विशेषत्वाने नमूद करायला हवे. भारतात ‘मुसलमान असुरक्षित आहेत’, अशा प्रकारे वरचेवर गवगवा करून हिंदूंवर कठोर आघात करण्याचा जो प्रयत्न चालवला जातो, त्यात कितपत तथ्य आहे, हे यातून लक्षात येते.
‘प्यू रिसर्च सेंटर’ ही धर्मनिरपेक्ष विचारसरणी लाभलेली आणि पाश्चिमात्य अमेरिकेतील अत्यंत प्रगतीशील संस्था वस्तूनिष्ठ अन् ‘ग्राऊंड झीरो’वर (प्रत्यक्ष समाजात मिसळून) जाऊन गोळा केलेल्या आकडेवारीतून आज बहुसंख्यांक हिंदू असलेल्या भारताचे गुणगान करत आहे.
‘सोनाराने कान टोचावे लागतात’ या उक्तीनुसार आतातरी भारतविरोधी गरळओक करणारी मंडळी ‘प्यू’ नावाच्या सोनाराच्या बोलण्यातून अंतर्मुख होतील का ? हा प्रश्न आहे. हे जरी शक्य नसले, तरी त्यांचे पितळ मात्र उघडे पडले आहे. तसेच या अहवालामुळे हिंदूंमध्ये अपराधीपणाचा भाव झटकून जगात अभिमानाने जगण्यासंदर्भात सुस्पष्टता निर्माण होईल, हेही निश्चित आहे.