भाजप स्वबळावर बहुमताने सत्तेत येईल ! – देवेंद्र फडणवीस

शिवसेनेशी युतीसाठी अनुकूल नसल्याचे संकेत !

देवेंद्र फडणवीस

पुणे – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात भाजप स्वबळावर बहुमतासह सत्तेत येईल, असे म्हटल्याने भाजप आगामी काळात शिवसेनेसह जाण्यासाठी इच्छुक नसल्याचे संकेत मिळाले आहेत. हे शिवसेनेचे अंतर्गत सूत्र असून पक्षप्रमुख यावर काय उत्तर द्यायचे ते बघतील, असेही फडणवीस यांनी या संदर्भात सांगितले.

सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँगे्रस, काँग्रेस हे शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत असल्याने पक्ष कमकुवत होत आहे. तसेच केंद्रीय तपासयंत्रणांचाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने मोदींशी जुळवून घेतलेले बरे, असा सल्ला प्रताप सरनाईक यांनी पत्राद्वारे पक्षप्रमुखांना दिला आहे.