बारामती तालुक्यातील (जिल्हा पुणे) सांगवीतील गीतांजली अभिषेक तावरे या विवाहितेने विषप्राशन करून आत्महत्या केली. या पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्रात आणखी एक हुंडाबळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. विवाहित महिलांचा जाच आणि छळ अल्प व्हावा, या उद्देशाने देशामध्ये २२ मे १९६१ या दिवशी हुंडाबळी कायदा अस्तित्वात आला; पण दुर्दैवाने ६० वर्षांनंतरही हुंडाबळीच्या घटना थांबलेल्या नाहीत, हे चिंताजनक आणि लज्जास्पद आहे. यामुळे ‘कायदा कागदावरच का ?’, असा प्रश्न मनात येतो.
भारतामध्ये प्रतिवर्षी २०० विवाहितांचा हुंडाबळी जात आहे. एवढेच नव्हे, तर पती आणि नातेवाईक यांच्याकडून छळ होण्याच्या टक्केवारीमध्येही वाढच होत आहे. हे प्रमाण शहरी भागातील सुशिक्षित आणि उच्चशिक्षित म्हणवणार्यांमध्येच अधिक आहे. महाराष्ट्रात एकूण साक्षरतेचे प्रमाण ८४.८ टक्के आहे. असे असतांना महिलांवरील अत्याचार न थांबणे आणि हुंड्यासाठी महिलांचा बळी घेतला जाणे, हे अत्यंत लाजिरवाणे आहे.
सध्याची स्थिती पाहिल्यास उच्चशिक्षण घेतले तरी आपण सुसंस्कारित होऊ शकत नाही, हे यातून लक्षात येते. आपल्यावर चांगले संस्कार होण्यासह त्यानुसार वागण्यासाठी आत्मबळच आवश्यक आहे आणि ते साधनेनेच येणार आहे. साधना करण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. धर्मामध्ये ‘कोणत्या परिस्थितीत कसे वागायला हवे ? आणि तसे न वागल्याने त्याचा काय परिणाम होतो ?’, हे सांगितले आहे. त्यामुळे व्यक्तीला परिणामांची जाणीव होऊन तो अयोग्य कृतींपासून स्वतःला रोखू शकतो. त्यामुळे सरकारने समाजाला शिस्त लावण्यासाठी केवळ कायदा करण्यावर भर न देता समाजाला धर्मशिक्षण द्यायला हवे, हे अधोरेखित होते. अन्यथा कायदा असूनही हुंडाबळी, गुटखा खाणे, गोहत्या होणे इत्यादी सर्व चालूच आहे. त्यामुळे कायदा असूनही हुंडाबळी का ? अशी स्थिती रहाणार नाही.
– श्री. अमोल चोथे, पुणे