कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. गेल्या २४ घंट्यांत देशभरात ९२ सहस्र ५९६ नवे रुग्ण आढळले, तर २ सहस्र २१९ जण मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या अडीच मासांतील ही निचांकी संख्या आहे. देशात अनेक राज्य सरकारांनी त्यांच्याकडील परिस्थिती पाहून दळणवळणबंदी मागे घेण्यास उणे-अधिक प्रमाणात आरंभही केला आहे. हे चित्र सर्व नागरिकांना निश्चितच दिलासा देणारे आहे. असे असले, तरी ही कोरोनाची संकटसमाप्ती नाही, हे आपण सर्वांनी आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे उत्सवी वातावरणासारखे वागणे पुढच्या लाटेला आयते आमंत्रण देणारे ठरेल. जी ढिलाई पहिल्या आणि दुसर्या लाटेत दाखवली गेली, ती तिसर्या लाटेत दाखवणे परवडणारे नाही.
संकटे ही अनुभवाची गाठोडी असतात. त्यातून शिकून पुढे जायचे असते. दुर्दैवाने आपल्याकडे ना प्रशासकीय स्तरावर तसे झाल्याचे दिसून आले, ना नागरिकांच्यास्तरावर ! उलट पहिल्या लाटेत नागरिकांनी जी दायित्वशून्यता दाखवली, तशीच ती दुसर्या लाटेच्या वेळीही दिसून आली. मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न राखणे, गर्दी करणे आदी गोष्टी सर्रास दिसून आल्या. वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ‘या संसर्गजन्य आजाराच्या प्रसारास प्रशासकीय यंत्रणेनेही काही प्रमाणात हातभार लावला’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. लसीकरणाची घोषणा करूनही ते सर्वांना आणि वेळेत न होणे, ही त्यातील मुख्य त्रुटी. यासह रुग्णवाहिकेच्या चालकांचा मनमानीपणा, अनेक रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाइकांची करण्यात आलेली अडवणूक, अंत्यसंस्कारासाठी अधिक पैसे उकळणे, असे अनेक अपप्रकार होतांना दिसले. यातून शिकून हे चित्र पालटून आपण तिसर्या लाटेच्या सामन्यासाठी सज्ज रहायला हवे. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. यावर देहलीतील ‘एम्स्’ रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ‘कोरोनाच्या तिसर्या लाटेत लहान मुले संक्रमित होतील, अशी कुठलीही माहिती देशात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध नाही’, असे स्पष्ट केले. असे असले, तर ती शक्यता गृहीत धरून उपाययोजना करण्यातच शहाणपण आहे. दुर्दैवाने जर तिसरी लाट मुलांवर परिणाम करणारी निघालीच, तर आपल्याकडे प्रशासकीय यंत्रणा ‘आम्ही अगोदरच सजग केले होते, त्यांनी दुर्लक्ष केले’, वगैरे स्वरूपाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून हात वर करतील. यात पुन्हा जनताच, विशेषतः लहान मुलेच नाहक भरडली जातील. असे होऊ द्यायचे नसेल, तर वर म्हटल्याप्रमाणे या संकटाची शक्यता गृहीत धरून उपाययोजना काढलेली सर्वांच्याच हिताची आहे. आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग मोठ्यांना होत होता, त्यामुळे सरकारसाठी ते सर्वसामान्यपणे शारीरिक स्तरावरचे आव्हान होते; पण जर संकटाचे हे लोण लहान मुलांपर्यंत पोचले, तर हे आव्हान भावनिक पातळीवरचेही होईल. त्यातून बाहेर पडणे मग सहजासहजी शक्य होणार नाही. तात्पर्य हेच की, आता हाती थोडा वेळ आहे, तर अधिकाधिक उपाययोजना काढून या संकटाची तीव्रता न्यून केली पाहिजे अन्यथा ‘पहिले पाढे पंचावन्न’, अशी आपली गत होऊन बसेल !