कोल्हापूर – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेकदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी श्री. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक यांच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर नागरिकांना साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी माजी खासदार श्री. धनंजय महाडिक, भाजपचे श्री. अशोक देसाई, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, सर्वश्री सुनील जाधव, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, युवासेना शहरप्रमुख श्री. चेतन शिंदे, श्री शहाजी तरुण मंडळाचे श्री. उदय शिंदे, सर्वश्री सागर शिंदे, कपिल केसरकर, संजय केसरकर यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने टाऊन हॉल उद्यान परिसरात ३४८ वा शिवराज्याभिषेकदिन साजरा !
शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८ वा शिवराज्याभिषेकदिन टाऊन हॉल उद्यान परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी परिसराची स्वच्छता करण्यात आली. नंतर संपूर्ण स्मारक परिसरामध्ये विविधरंगी फुलांच्या माळांनी आणि फुलांनी सजावट करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीशेजारील जुना भगवा ध्वज बदलून तेथे नवीन ध्वज फडकवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करून पूजन करण्यात आले.
प्रेरणा मंत्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाची गारद देऊन झाल्यानंतर महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. या वेळी शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. साताप्पा कडव, सर्वश्री संदीप पाडळकर, गणेश मांडवकर, सुधीर जितकर, प्रवीण कुरणे, श्रेयस कुरणे यांसह अन्य उपस्थित होते.