नुकताच रांची (झारखंड) येथील कांची नदीवर ३ वर्षांपूर्वी १३ कोटी रुपये व्यय करून बांधलेला पूल ‘यास’ चक्रीवादळाच्या तडाख्याने पडला. आतापर्यंत बांधलेले पूल लवकर पडण्याच्या, तसेच बांधकाम चालू असतांनाच पूल पडण्याच्या अशा अनेक घटना झाल्या आहेत. देश स्वतंत्र झाल्यानंतर पुलांची ही दयनीय स्थिती पाहिल्यानंतर आपण ७४ वर्षांत काय प्रगती केली ? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतो. कुठे १०० वर्षे टिकणारे पूल बांधून त्याचा १०० वर्षांनंतरही पाठपुरावा घेणारे इंग्रज आणि कुठे आपण ? ही खंत प्रत्येक देशप्रेमीच्या मनात निर्माण झाल्यावाचून रहात नाही.
३ ऑगस्ट २०१६ या दिवशी कोकणातील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन दगडी पूल महापुराने कोसळला. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १४७ पूल कोणत्याही क्षणी पडतील, अशी त्यांची स्थिती होती. यानंतर वर्ष २०१९ मध्ये मुंबईतील पादचारी पूल कोसळला. त्या वेळीही मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पुलांच्या सर्वेक्षणात १८६ पूल धोकादायक असल्याचे दिसून आले. ‘सध्या देशात १०० पेक्षा अधिक पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतील, अशा स्थितीत आहेत’, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्र्यांनी लोकसभेत दिली.
पुलांच्या या दयनीय स्थितीमागे पूल बांधकामात अनेक त्रुटी ठेवणे, साहित्य दर्जेदार नसणे, जमिनीचे सर्वेक्षण न करणे, नदीपात्रातील खनिजांचे उत्खनन करणे आदी कारणांमुळे पुलांना ३-४ वर्षांत तडे जाणे, भेगा पडणे आणि काही भाग कोसळणे या गोष्टी प्रामुख्याने आहेत. तसेच पुलाचे कंत्राट देतांना कामाचा दर्जा निकृष्ट असला, तरी राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांमुळे पुन्हा त्याच ठेकेदारांना कंत्राट देणे, हेही होत आहे. हे सर्व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने गंभीर आहे. अशा दोषींवर तात्काळ कडक कारवाई न झाल्याने यामध्ये पालट होतांना दिसत नाही. प्राचीन काळी महान ऋषीमुनींनी लिहीलेल्या बांधकामविषयक माहितीवरून बांधलेली मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत. एवढेच काय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले गडकोट किल्लेही याची साक्ष देत आहेत; परंतु हे कृतीत येण्यासाठी भ्रष्टाचाराची कीड नष्ट होणे आवश्यक आहे. एकेकाळी महासत्ता असणारा भारत भ्रष्टाचारामुळे मागे आहे. तो संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी कंबर कसणे अपेक्षित !
– श्री. अमोल चोथे, पुणे