कोरोनाच्या कालावधीत प्रथमच अन्नधान्य चोरीप्रकरणी गुन्हा नोंदवतांना संवेदनशीलता दाखवावी ! – मुंबई उच्च न्यायालय

कारागृहात तात्पुरत्या वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यामुळे प्रथमच अन्नधान्याच्या चोरीचा गुन्हा करणार्‍यांविषयी पोलिसांनी तातडीने गुन्हे नोंदवू नयेत. अशा प्रकरणी संवेदनशीलता दाखवावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. कोरोनाच्या काळात बंदीवानांच्या सुरक्षेसाठी न्यायालयाने स्वत:हून प्रविष्ट केलेल्या याचिकेवर २ जून या दिवशी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने कारागृहात वैद्यकीय सुविधेविषयी विचारणा करत कारागृहासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या कराव्यात, तसेच काही वेळ भेट देणारे वैद्यकीय पथक नेमावे, असे निर्देश दिले. (बंदीवानांच्या आरोग्याविषयीच्या मूलभूत गरजांविषयीही न्यायालयाला का सांगावे लागते ? या गोष्टी कारागृह व्यवस्थापकांच्या का लक्षात येत नाहीत ? – संपादक)

न्यायालयाने म्हटले, ‘कोरोनाच्या काळात अटकेविषयी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देऊन पोलिसांना संवेदनशील करायला हवे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अटकेआधी संबंधित गुन्हात अटक आणि कोठडी आवश्यक आहे का ? याची पोलिसांनी निश्‍चिती करावी. कोरोनाच्या कालावधीत घडलेल्या गुन्ह्यांचा लेखी तपशील सादर करावा.’ या वेळी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी ‘मागील २ मासांत राज्यातील ७ कारागृहांतील २ सहस्र १६८ बंदीवानांना जामीन संमत करण्यात आला आहे; मात्र नव्याने अटक होणार्‍या गुन्हेगारांमुळे कारागृहात गर्दी होत आहे’, असे न्यायालयात सांगितले.

नवी मुंबईत एकही अद्ययावत शासकीय रुग्णालय का नाही ? – न्यायालय

ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथील बंदीवानांना उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयामध्ये का आणले जाते ? त्यांना तेथील सरकारी रुग्णालयात का भरती करत नाही ? नवी मुंबई हे शहर वसवून इतकी वर्षे झाली, तरी अद्याप तिथे एकही शासकीय रुग्णालय का उभारण्यात आलेले नाही ?, तळोजा येथील बंदीवानांना उपचारांसाठी जे.जे. रुग्णालयापर्यंत का यावे लागते ? याचे स्पष्टीकरण द्यावे, असे न्यायालयाने या वेळी सांगितले. यावरील पुढील सुनावणी १० जून या दिवशी होणार आहे.