Odisha Army Officer Fiancee Molested : पोलिसाने सैनिकाच्‍या होणार्‍या पत्नीचा लैंगिक छळ करून केली मारहाण !

  • ५ पोलीस निलंबित

  • पोलीस ठाण्‍यातच घडली घटना

  • गुंडांविरुद्ध तक्रार करण्‍यासाठी पीडिता गेली होती पोलीस ठाण्‍यात

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशातील पोलिसांनी एका सैनिकाच्‍या होणार्‍या पत्नीचा लैंगिक छळ केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. १४ सप्‍टेंबर या दिवशी भुवनेश्‍वर या ठिकाणी असलेल्‍या एका पोलीस ठाण्‍यातच ही घटना घडली. या प्रकरणात ५ पोलिसांना निलंबित करण्‍यात आले आहे. यामध्‍ये एका पोलीस निरीक्षकासह २ महिला पोलिसांचाही समावेश आहे.

या घटनेनंतर पीडितेने प्रसारमाध्‍यमांसमोर येऊन पोलिसांची कुकृत्‍ये उघड केली. ती म्‍हणाली,

१. मध्‍यरात्री १ वाजता मी माझे उपाहारगृह बंद करून घरी चालले होते. माझ्‍यासमवेत माझा होणारा नवराही होता. त्‍या वेळी काही टवाळखोरांनी आमची चारचाकी गाडी रोखली आणि ते आमच्‍याशी हुज्‍जत घालू लागले.

२. मी आणि माझा होणारा नवरा यातून कसेबसे वाचलो आणि या प्रकरणाची दाद मागण्‍यासाठी आम्‍ही पोलीस ठाण्‍यात गेलो. त्‍या वेळी पोलीस ठाण्‍यात एक महिला हवालदार गाऊन घालून बसली होती.

३. मी जेव्‍हा तिच्‍याकडे साहाय्‍य मागितले, तेव्‍हा ती माझ्‍याशीच उद्धटपणे बोलली. तिला मी अधिवक्‍ता असल्‍याचे, तसेच ‘गुन्‍हा नोंदवून घेणे, हे पोलिसांचे कर्तव्‍य आहे’, असे सांगितले. त्‍यावर ती महिला पोलीस हवालदार माझ्‍यावरच चिडली. तिने माझ्‍या होणार्‍या नवर्‍याला कारागृहात टाकले. मी त्‍यांना तो सैनिकी अधिकारी असल्‍याचे सांगितले. त्‍या वेळी दोन महिला पोलीस कर्मचारी आल्‍या आणि त्‍यांनी मला मारहाण करणे चालू केले. माझे केस ओढत मला फरफटत नेले.

४. त्‍या दोन महिला पोलिसांनी माझे जॅकेट काढून माझे हात बांधले. माझी ओढणी काढून  माझे पायही बांधले आणि मला एका खोलीत बंद केले.

५. त्‍यानंतर काही वेळाने एक पोलीस निरीक्षक तेथे आला. त्‍याने माझी अंतर्वस्‍त्रे काढली आणि माझ्‍या गुप्‍तांगावर मारू लागला. माझे लैंगिक शोषण करण्‍यात आले.

६. सकाळी ६ वाजता पुन्‍हा पोलीस अधिकारी आला. त्‍याच्‍यासह एक महिलाही होती. त्‍या पोलीस अधिकार्‍यानेही माझी अंतर्वस्‍त्रे खेचली आणि त्‍याचे गुप्‍तांग दाखवत माझ्‍याशी अत्‍यंत घाणेरड्या भाषेत बोलू लागला. हे सर्व सांगतांना पीडितेला अश्रू अनावर झाले. या प्रकरणी पीडितेने पोलीस कर्मचार्‍यांच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट केली आहे.

संपादकीय भूमिका

सैनिकाच्‍या होणार्‍या पत्नीशी असे वागणारे पोलीस सर्वसामान्‍य महिलांशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! अशा पोलिसांना आजन्‍म कारागृहात डांबले पाहिजे !