Air Marshal Amar Preet Singh : एअर मार्शल अमरप्रीत सिंह भारताचे नवे हवाईदल प्रमुख

एअर मार्शल अमरप्रीत सिंह

नवी देहली – एअर मार्शल अमरप्रीत सिंह सध्या हवाईदलाचे उपप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. ते ३० सप्टेंबर २०२४ या दिवशी एअर चीफ मार्शल अथात् पुढील हवाईदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. सध्याचे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी ३० सप्टेंबर २०२४ या दिवशी निवृत्त होणार आहेत.

एअर मार्शल अमरप्रीत सिंह यांच्याविषयी थोडक्यात माहिती

एअर मार्शल अमरप्रीत सिंह यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९६४ या दिवशी झाला. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी, संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय यांचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर १९८४ मध्ये त्यांची भारतीय हवाईदलामध्ये ‘फायटर पायलट’ म्हणून नियुक्ती झाली. अनुमानेे ४० वर्षे त्यांनी हवाईदलात विविध पदे भूषवली आहेत. त्यांनी परदेशातही भारतीय हवाईदलाच्या अंतर्गत महत्त्वाचे दायित्व सांभाळले आहे. एअर मार्शल अमरप्रीत सिंह हे एक पात्र उड्डाण प्रशिक्षक आणि हुशार पायलट आहेत. त्यांना ५ सहस्र घंट्यांपेक्षा अधिक काळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांच्यावर लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजसच्या उड्डाण चाचणीचे काम सोपवण्यात आले होते. त्यांनी दक्षिण पश्‍चिम हवाई कमांडमध्ये एअर डिफेन्स कमांडर आणि इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. हवाईदलाच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते केंद्रीय हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.