Sanctity Of Tirupati ‘Laddu Prasadam’ : प्रसादाचे लाडू आता पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र ! – तिरुमला तिरुपती देवस्थानम्

तिरुमला तिरुपती देवस्थानम्

अमरावती (आंध्रप्रदेश) : प्रसादम् म्हणजे प्रसादाचे लाडू आता पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र आहेत. ते पुढेही तसेच रहाण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे तिरुपती बालाजी मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’कडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राजकीय लाभासाठी देवाचा वापर करत आहेत ! – माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा आरोप

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी

प्रसादाच्या लाडूंच्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारवर आरोप झाल्याने रेड्डी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जुलै मासातील प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला आहे. तेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते. नायडू राजकीय लाभासाठी देवाचा वापर करत आहेत. त्यांनी वस्तूस्थितीचा विपर्यास केला. या प्रकरणी पंतप्रधान मोदी आणि भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून नायडू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे.

आम्ही तिरुपती मंदिराला कधीही तूप पुरवलेले नाही ! – अमूल आस्थापनाचे स्पष्टीकरण

या प्रकरणात अमूल आस्थापनानेही स्पष्टीकरण दिले आहे. आस्थापनाने म्हटले आहे की, ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’ला अमूल तूप पुरवले जात होते’, असे काही सामाजिक माध्यमांत प्रसारित केले जात आहे. आम्ही कळवू इच्छितो की, आम्ही तिरुपती मंदिराला कधीही तूप पुरवलेले नाही.

आम्ही अमूल तूप आमच्या अत्याधुनिक उत्पादन संयंत्रांमध्ये दुधापासून सिद्ध करतो. ते ‘आय.एस्.ओ.’ (आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था) प्रमाणित आहे. अमूल तूप हे उच्च दर्जाच्या शुद्ध दुधाच्या फॅटपासून बनवले जाते.

तुपाचा पुरवठा करणार्‍या ५ आस्थापनांसमवेतचे करार रहित !

‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’ने तुपाचा पुरवठा करणार्‍या ५ आस्थापनांसमवेतचे करार रहित केले आहेत. यात प्रीमियर ग्री फूड्स, कृपाराम डेअरी, वैष्णवी, श्री पराग मिल्क आणि ए.आर्. फूड कंपनी यांचा समावेश आहे. यांपैकी केवळ ए.आर्. डेअरीच्या तुपात गोमांसापासून बनवलेली चरबी आढळून आली. यानंतर देवस्थानम्’ने गेल्या अनेक वर्षांपासून तुपाचा पुरवठा करणार्‍या कर्नाटकातील ‘कर्नाटक सहकारी महासंघा’समवेत नवीन करार केला आहे. या महासंघासमवेतचा करार संपुष्टात आला होता; कारण त्याच्या तुपाचे मूल्य अधिक होते.