मदर तेरेसा अग्रलेखाविषयी त्वरित क्षमा मागणारे कुबेर छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानावर क्षमा का मागत नाहीत ? – हिंदु जनजागृती समिती

पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाविषयी राज्य सरकार गप्प का ?

मुंबई – पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रिनैसंस द स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातील वादग्रस्त मजकुरावरून शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची अपकीर्ती करण्यात आल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला आहे, तसेच स्वतः कोल्हापूर येथील छत्रपती गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनीही ‘राज्य सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी’, अशी मागणी केली आहे. अशा वेळी राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही कारवाई का केली जात नाही ?, याचे आश्‍चर्य वाटत आहे. त्यामुळे सरकारने योग्य त्या कारवाईसाठी या पुस्तकातील अवमानकारक मजकुराच्या संदर्भात इतिहास अभ्यासकांची एक समिती नेमून त्यावर योग्य ती कारवाई करावी, तसेच तोपर्यंत पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्याकडे निवदेनपत्र पाठवून केली आहे.

समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

१. पत्रकार गिरीश कुबेर हे सतत वादग्रस्त लिखाण करत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदवी स्वराज्यातील कालखंड, तसेच तत्कालीन भिन्न राजकीय परिस्थिती लक्षात न घेताच, या दोघा नरवीरांची तुलना करणे अयोग्यच आहे. त्यातही ‘छत्रपती संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता आणि परराष्ट्र धोरण नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर येण्यासाठी संभाजीने रक्तपात घडवला’, असे थेट आरोप करणे, म्हणजे या महापुरुषांना लांच्छन लावणे आहे.

२. बाबर-औरंगजेबादी क्रूर शासकांचे अत्याचार लपवून त्यांच्या जीवनातील केवळ कथित सहिष्णुता दाखवणार्‍या प्रसंगांचीच चर्चा करणार्‍या या धर्मनिरपेक्ष पत्रकारांना अचानक छत्रपती संभाजीराजे यांच्या असहिष्णुतेची जाणीव होण्यामागे निश्‍चितच काही तरी हेतु आहे. त्यातही ‘इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कुणी व्यक्तिमत्त्व असेल, तर बाजीराव पेशवे आहेत’, असा उल्लेख करून पुन्हा मराठा-ब्राह्मण वाद उकरून काढण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना ?, हेही सरकारने तातडीने पहायला हवे.

३. गिरीश कुबेर यांनी ‘दैनिक लोकसत्ता’च्या ‘असंतांचे संत’ या संपादकीयातून मदर तेरेसा यांच्याविषयी टीकात्मक लिखाण केल्यावर ख्रिस्ती समाजाने त्यास विरोध केला होता. परिणामी दुसर्‍याच दिवशी कुबेर पहिल्या पानावर जाहीर क्षमा मागून मोकळे झाले. मग हिंदु समाजातून, लाखो शिवप्रेमींकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असतांना छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयीच्या लिखाणाच्या संदर्भात स्वतःची भूमिका कुबेर का स्पष्ट करत नाहीत ? सरकारनेच आता याविषयी तातडीने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.