तौक्ते चक्रीवादळामुळे हानी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आमदार वैभव नाईक यांच्याकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पहाणी

मालवण – तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग किल्ल्याला बसला आहे. १४ दिवसांनंतर येथील वीजपुरवठा चालू करण्यात यश आले आहे, तर किल्ल्यातील घरे, मंदिरे यांची वादळामुळे हानी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन पहाणी केली आणि तेथील रहिवाशांची विचारपूस केली, तसेच तेथे झालेल्या हानीच्या पंचनाम्याचा आढावाही घेतला.

या वेळी किल्ल्यातील रहिवाशांनी आमदार नाईक यांना वस्तूस्थितीची माहिती दिली. त्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क करून किल्ल्यातील रहिवाशांना तेथून मालवण शहरात ये-जा करण्यासाठी बोटीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच आमदार नाईक यांनी किल्ल्यावरील शिवराजेश्‍वर मंदिर, श्री भवानीमाता मंदिर यांची पहाणी केली आणि शिवराजेश्‍वर मंदिराच्या नुतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरि खोबरेकर, तपस्वी मयेकर, सन्मेष परब, मंगेश सावंत, किल्ल्यावरील रहिवासी श्रीराम सकपाळ, सयाजी सकपाळ आदी उपस्थित होते.