सौ. सरस्वती कुलकर्णी आणि त्यांचे पती श्री. अरविंद कुलकर्णी हे दोघेही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करत आहेत. त्यांची दोन मुले (राहुल आणि कु. रूपाली) रामनाथी आश्रमात पूर्ण वेळ साधना करतात. सौ. सरस्वती कुलकर्णी यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दांत पुढे दिला आहे.
‘मुलांनी विवाह करून मायेत अडकू नये, तर साधना करावी’, असे वाटणार्या एकमेवाद्वितीय सौ. सरस्वती अरविंद कुलकर्णी (राहुल आणि रूपाली यांच्या आई) यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. बालपण
‘माझे माहेर सातारा येथे आहे. मी ७ – ८ वर्षांची असतांना माझी आई देवाघरी गेली. त्या वेळी आम्ही चारही भावंडे लहान होतो; म्हणून माझ्या बाबांनी आम्हा दोघी बहिणींना पंढरपूर येथील वसतीगृहात ठेवले. तेथे मी पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर आम्ही सातारा येथील वसतीगृहात राहिलो. तेथे मी सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
२. विवाह
मी १५ – १६ वर्षांची असतांना माझा विवाह झाला. माझे यजमान सरकारी नोकरीत होते. मी लहान असतांनाच माझी आई वारली आणि त्यानंतर मी वसतीगृहात राहिले. त्यामुळे मला ‘काम कसे करायचे ?’, याविषयी काहीच माहिती नव्हती. माझे सासू-सासरे आणि सासरकडील सर्व मंडळींनी या गोष्टीवरून मला त्रास दिला. त्यानंतर ७ – ८ वर्षांनी सासरच्या व्यक्तींनी आम्हाला वेगळे रहायला सांगितले. त्यामुळे आम्ही दोघे भाड्याने घर घेऊन राहिलो. त्या वेळी सासरच्या व्यक्तींनी मला केवळ एक पेटी आणि ३ – ४ भांडी दिली. माझ्या वडिलांनी ते साहित्य मला लग्नात दिले होते. त्यानंतर यजमानांचे स्थानांतर फलटण येथे झाले. आम्ही फलटण येथे रहायला गेलो.
३. साधनेला आरंभ
३ अ. स्वप्नात शिवाचे दर्शन होणे आणि शिवाचा नामजप करणे : एके रात्री मला स्वप्नात पांढराशुभ्र नंदी आणि शिवपिंडी यांचे दर्शन झाले. त्यानंतर काही दिवसांनी मी एका देवळात गेले होते. तेथील नंदी पांढराशुभ्र (गारेच्या दगडाचा) होता. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मला स्वप्नात दर्शन दिलेला नंदी आणि शिवपिंडी हीच होती.’ तेव्हापासून मी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप करू लागले.
३ आ. फलटण येथे देवळांत अनेक पोथ्यांची पारायणे व्हायची. मी ते ऐकायला जायचे. तेव्हापासून मला देवाची ओढ लागली.
३ इ. मला ‘मूल व्हावे’, यासाठी एका महिलेने मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला सांगितला. तेव्हापासून मी शिवाचा नामजप करण्यासह दत्ताचाही नामजप करू लागले.
४. घरकामे करून कुटुंबाला आर्थिक साहाय्य करणे
आमची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मी घरकामे (धुणे-भांडी, स्वयंपाक आदी मिळेल ती कामे) करू लागले. घरातील कुणाचा आधार नसल्याने मी कामाला गेल्यावर इतरांनी मुलांना सांभाळले. त्यानंतर यजमानांचे स्थानांतर वडूज (ता. खटाव, जिल्हा सातारा) येथे झाले.
५. सनातन संस्थेशी संपर्क
५ अ. प्रसारफेरी आणि सार्वजनिक सभा पाहिल्यावर संस्थेचे कार्य चांगले असल्याची निश्चिती होणे : मुलांनी (राहुल आणि रूपाली यांनी) सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली. आरंभी मी त्याला विरोध केला. एकदा रूपालीने मला बाहेरगावी एका प्रसारफेरीला आणि सार्वजनिक सभेला नेले. तेव्हापासून ‘हे चांगले कार्य आहे’, हे माझ्या लक्षात आले.
५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर ‘ते मुलीचा आध्यात्मिक त्रास न्यून करतील, तिची काळजी घेतील’, असे वाटून निश्चिंत होणे : त्या वेळी रूपालीला आध्यात्मिक त्रास असल्याचे लक्षात आले. वर्ष २००३ मध्ये मुले मिरज आश्रमात सेवेसाठी गेली. आम्ही दोघे (मी आणि यजमान) मिरज आश्रमात गेल्यावर आमची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मुलांची काळजी करू नका. मुलीचा आध्यात्मिक त्रास नामजपादी उपायांनी जाईल.’’ त्या वेळी ‘व्यावहारिक जीवनातील यश-अपयश किंवा अन्य त्रास यांविषयी आपण समाजाला सांगू शकतो. आध्यात्मिक त्रास कुणाला सांगणार आणि मुलीचे त्रास कोण न्यून करणार ? संतच आध्यात्मिक त्रास न्यून करू शकतात. परात्पर गुरुदेव तिची सर्व काळजी घेतील’, असे वाटून मी निश्चिंत झाले.
६. साधनेप्रती निष्ठा व्यक्त करणारे आध्यात्मिक दृष्टीकोन
६ अ. मुलांनी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याविषयी : ‘मी कुठेही गेले, तरी काम करावेच लागते. मुलाने बाहेर व्यवसाय किंवा नोकरी केली, तर त्याला तेथे काम करावे लागेल आणि आश्रमातही सेवा करावी लागते. बाहेर काम केल्यावर पैसे मिळत असले, तरी इथे (आश्रमात) काम केल्यावर समाधान मिळते आणि आनंद जाणवतो. सनातनचे साधक आश्रमातील मुलांवर कोणताही ताण येऊ देत नाहीत. मुलांवर चांगले संस्कार करतात. आश्रमात सर्व जण एकोप्याने रहातात. एकमेकांवर प्रेम करतात. त्यामुळे मुलांनी आश्रमात रहावे, तेथे सेवा करावी’, असे मला वाटायचे.
६ आ. मुलांनी सण-उत्सवाला घरी न येण्यविषयी : ‘मुलगी सासरी गेली की, सासर हेच तिचे घर असते. रूपालीचे लग्न झाले असते, तर सणाला ती सासरी राहिली असती किंवा राहुल परगावी नोकरीला असता, तर त्याला प्रत्येक सणाला घरी यायला जमले नसते. तसेच हे आहे. मुलांना सणाला घरी कशाला बोलवायचे ? सणाच्या वेळी अन्य साधक घरी जातात. त्यांच्या घरी अडचणी असतात. त्यांना कामे असतात. सणाच्या वेळी आश्रमात साधकसंख्या अल्प असते. त्यामुळे सणाच्या वेळी मुलांनी आश्रमातच राहून सेवा करायला हवी’, असे मला वाटायचे.
६ इ. मुलांकडून कोणत्याही अपेक्षा नसणे : आश्रमातील अनेक साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे; पण मला माझ्या मुलांकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत. ज्याच्या-त्याच्या कुवतीनुसार त्याला जमते. ‘मुले गुरूंच्या चरणांपाशी आहेत ना’, एवढाच विचार मी करते. आश्रमात सर्वांना समान वागणूक असते. कोणताही भेदभाव नसतो. येथे कोणतीही पदवी नसते. त्यामुळे मला मुलांची काळजी वाटत नाही.
६ ई. मुलांच्या विवाहाविषयी : एकदा विवाह झालेल्या काही साधिका एकमेकींशी बोलत होत्या. त्या त्यांच्या पतीविषयी बोलत असल्याचे माझ्या लक्षात आले. मला वाटले, ‘राहुलने व्यवहारातील मुलीशी नको; पण साधिकेशीही विवाह करायला नको; कारण तेच विचार त्याच्या मनात रहातील. एकमेकांत अडकणे होईल. असेच मला रूपालीविषयीही वाटले. ‘राहुल आणि रूपाली या दोघांनीही विवाह करू नये’, असे मला वाटते. त्या दोघांनाही विवाह करायचा नव्हता. ‘माझ्या मुलांनी ‘देवभक्त किंवा देशभक्त’ व्हावे’, असे मला पहिल्यापासून वाटते.
६ उ. नातेवाइकांनी विरोध केल्यावर : माझे एक नातेवाईक मला सांगायचे, ‘‘मुले तरुण आहेत, तोपर्यंत आश्रमातील लोक मुलांकडून कामे करवून घेतील. मुलांकडून काम होईनासे झाले की, त्यांना आश्रमातून घरी पाठवतील.’ असे एका संघटनेने केले होते. त्या संघटनेने तरुण कार्यकर्त्यांकडून कामे करवून घेतली आणि नंतर त्यांना घरी पाठवले.’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मी आश्रम पाहिला आहे. तेथे वयस्करही आहेत. तेथे सर्वांची चांगली काळजी घेतात. माझ्या मुलांचे तसे काही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका.’’
७. अनुभूती
७ अ. नामजप करतांना किंवा स्वप्नात अनेक वेळा शिवाचे दर्शन होणे : मुले आश्रमात रहायला आल्यावर आम्ही (मी आणि यजमान) दोघेच घरी होतो. त्या वेळी मी जमेल तशी सेवा आणि नामजप करायचे. मला नामजप करतांना किंवा स्वप्नात अनेक वेळा शिवाचे दर्शन व्हायचे.
७ आ. ‘रक्षाबंधनाच्या दिवशी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव आणि देवता घरी आले आहेत’, असे दिसणे : एकदा रक्षाबंधनाच्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘देवाला राखी बांधा’, अशा आशयाची चौकट प्रसिद्ध झाली होती. माझ्याजवळ देवाला देण्यासाठी काहीच नव्हते. त्या वेळी ‘मी काय करू ?’, असा माझ्या मनात विचार येऊन माझ्या डोळ्यांत पाणी आले. तेच पाणी मी माझ्या जवळ असलेल्या देवाच्या चित्राला लावले आणि कपाळावरील कुंकवाला बोट लावून बोटाला लागलेले कुंकू चित्राला लावले. त्या वेळी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव तेथे आले. त्यांनी तेथे जवळ असलेली कुंकवाची डबी माझ्या हातात दिली आणि मला ते कुंकू देवाला लावण्यास सांगितले. त्या वेळी ‘अन्य देवता घरातील आसंद्या आणि पलंग यांच्यावर बसले आहेत’, असे मला दिसले.
७ इ. देवीचे दर्शन होणे : एकदा नामजप करत असतांना मला देवीचे दर्शन झाले आणि ‘रामनाथी आश्रमातील साधिका सौ. कस्तुरी भोसले माझी ओटी भरत आहेत’, असे मला दिसले. काही दिवसानंतर रूपालीशी भ्रमणभाषवर बोलतांना मला समजले, ‘मला ज्या दिवशी देवीचे दर्शन झाले, त्याच दिवशी रामनाथी आश्रमात देवीसंदर्भातील एक यज्ञ केला होता.’
७ ई. देवी आणि गणपति यांचे दर्शन होणे अन् काही दिवसांनंतर रामनाथी आश्रमात भवानीदेवी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींचे आगमन होणे : मी रामनाथी आश्रमात रहायला आल्यानंतर नामजप करत असतांना एके दिवशी मला देवीचे दर्शन झाले आणि त्यानंतर हार घातलेला, हातात पाश घेतलेल्या गणपतीचे दर्शन झाले. काही दिवसानंतर रामनाथी आश्रमात भवानीदेवी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींचे आगमन झाले. त्यांचे दर्शन घेतांना माझ्या लक्षात आले, ‘नामजप करत असतांना मला याच मूर्ती दिसल्या होत्या.’
आता माझ्या मनात कोणतेच विचार नसतात. ‘माझ्याकडून अजून म्हणावा, तेवढा नामजप होत नाही किंवा सेवाही होत नाही’, एवढाच माझ्या मनात विचार येतो.
८. मोठ्या भावाप्रमाणे परात्पर गुरुदेवांविषयी जवळीक वाटणे
मी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘परम पूज्य’ असे म्हणते. मला ते ‘माझे मोठे भाऊ आहेत’, असे वाटते. मनातून त्यांच्याशी बोलतांना मोठ्या भावाशी बोलल्याप्रमाणे मी त्यांना माझ्या मनातील विचार सांगते. ‘त्यांनी आपल्या सर्वांना (साधकांना आणि कुटुंबाला) जवळ घेतले आहे. ते आता आपल्याला कधी दूर लोटणार नाहीत’, असे मला वाटते.’
– सौ. सरस्वती अरविंद कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.११.२०२०)
|