देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरायला हवे ! – उदय माहुरकर, माहिती आयुक्त, केंद्र सरकार

पाकिस्तानची निर्मिती होणार, असे स्वातंत्र्यवीर सावरकर वर्ष १९३७ पासूनच सांगत होते. देशात केवळ १ ते २ वेळाच पाकिस्तान या शब्दाचा उच्चार झाला असतांना तो हेरून त्यांनी हे भाकित केले होते. अल्पसंख्यांकांचे वेगळे राष्ट्र ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती. त्यांची विचारधारा देशाला एकत्र करणारी होती. सावरकर यांची हिंदु राष्ट्राची संकल्पना ही स्पष्ट होती. हिंदु राष्ट्रात त्यांना सर्व जाती-धर्मांना समान हक्क अभिप्रेत होते. त्यांची लढाई ही सामान्य अधिकारांसाठी होती. सावरकर यांचा प्रखर राष्ट्रवाद हा मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या आड येत असल्यामुळे काँग्रेसकडून त्यांना विरोध झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकर यांचे विचार काँग्रेसने आणि देशाने ऐकले असते, तर त्या वेळी देशाची फाळणी झाली नसती. आज देशाचे दुसरे विभाजन नको असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्ट्रवादाचे विचार आत्मसात करून त्याचे अनुसरण करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार केला पाहिजे. तसेच आपल्या देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरले पाहिजे.