आरोग्यसेवेचे आदर्श ‘मॉडेल’ ठरत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कौतुक
हिंदूंचीच मंदिरे अशाप्रकारे रुग्णांना साहाय्य करत असल्याचे ऐकायला मिळते. अन्य धर्मीय साहाय्यासाठी पुढे न येता केवळ धर्मांतरासाठीच पुढे असतात, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
शिर्डी (नगर), २९ मे – येथील साई मंदिरात कोरोनापूर्वी दर्शनासाठी वर्षाकाठी देश-विदेशातून अनुमाने १ कोटी ७० लाख भाविक येत असत. त्यातून अनुमाने ३८० कोटींच्या आसपास अर्पण जमा होत होते; परंतु कोरोनामुळे मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने वर्षभरात केवळ ९४ कोटी अर्पण जमा झाल्याने त्यात २८६ कोटींची कमी आली आहे. तरीही आरोग्यसेवेचा वसा जपत संस्थानने वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अनुमाने २०३ कोटींची तरतूद करून साईंच्या खजिन्यातून अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत संस्थान रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये वर्षभरात अनुमाने ७ सहस्र कोरोना रुग्णांवर विनामूल्य उपचार केले आहेत. रुग्णांसमवेत नातेवाइकांनाही विनामूल्य जेवण आणि निवासव्यवस्थाही करण्यात आली आहे.
आरोग्यसेवेचे आदर्श ‘मॉडेल’ ठरत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याविषयी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांचे नुकतेच कौतुक केले होते. साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय, साईनाथ सामान्य रुग्णालय तसेच कोविड सेंटरमध्ये अत्याधुनिक उपचारासह ६४० खाटा कोरोना रुग्णांसाठी असून यात १४० ऑक्सिजन बेड आणि २० व्हेंटिलेटर्सचा समावेश आहे.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितले की, कोरोना संकटात गरीब रुग्णांना अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून दिले. नीता अंबानी आणि रमणी यांच्या ३ कोटींच्या दानातून एका मिनिटाला हवेतून १२०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लँट तातडीने उभारून ८ घंट्यात कोरोना रिपोर्ट देणारी अत्याधुनिक प्रयोगशाळाही रुग्णसेवेत सिद्ध करण्यात आली आहे. (कुठे कोविडच्या नावाखाली रुग्णांकडून लाखो रुपयांची वसुली करणारी रुग्णालये आणि कुठे आरोग्यसेवेचा वसा जोपासत कोरोना संकटात गरीब रुग्णांना अत्याधुनिक उपचार विनामूल्य उपलब्ध करून देणारी मंदिरे ! कोरोनाकाळात मंदिरांनी काय केले ? असे म्हणणार्यांना ही चपराकच आहे ! – संपादक)