भक्त, संत आणि ईश्‍वर यांमधील भेद !

॥ श्रीकृष्णाय नमः ॥

पू. अनंत आठवले

प्रश्‍न : असे म्हणतात की, थोर भक्त, संत आणि ईश्‍वर हे एकच असतात. असे असते की, त्यांच्यात काही भेद आहे ?

उत्तर :

१. ज्ञानी भक्ताचा आत्मा आणि ईश्‍वर ह्यांच्यात स्वरूपभेद नसला, तरी स्थूल आणि सूक्ष्म देह असेपर्यंत शरीरस्थ आत्मा ईश्‍वराशी सर्वार्थाने एकरूप न होणे

‘भगवान् श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत (अध्याय ७, श्‍लोक १६, १७ आणि १८ मध्ये) भक्तांचे चार प्रकार सांगून त्यांच्यातील ‘ज्ञानी भक्त तर माझे स्वरूपच आहे’, असे मी मानतो’, असे म्हटले आहे. म्हणजे पूर्ण चित्तशुद्धी होऊन आत्मस्वरूपाची अनुभूती आलेला ज्ञानी भक्त आणि ईश्‍वर ह्यांच्यात तत्त्वतः भेद राहत नाही; पण तरीसुद्धा सूक्ष्म आणि स्थूल देहांत असेपर्यंत पूर्ण अद्वय (अद्वैत) होत नाही. उदाहरणाने हे स्पष्ट होईल. एक रिकामे मडके आहे, त्यावर झाकण ठेवलेले आहे. त्या मडक्यातील वायू आणि आकाशातील वायू ह्यांच्या स्वरूपात काही भेद नाही, तरीही तो वायू मडक्यात असेपर्यंत आकाशातील वायूशी एकरूप होऊ शकत नाही, न तो वेगाने वाहू शकतो, न तो ढग ढकलू शकतो. त्याप्रमाणे ज्ञानी भक्ताचा आत्मा आणि ईश्‍वर ह्यांच्यात स्वरूपभेद नसला, तरी स्थूल आणि सूक्ष्म देह असेपर्यंत शरीरस्थ आत्मा ईश्‍वराशी सर्वार्थांनी एकरूप होत नाही.

२. स्थूल आणि सूक्ष्म देहांत असेपर्यंत मनुष्य ईश्‍वर न होता ईश्‍वराचा अंशच राहत असणे

मनुष्य ईश्‍वराचा कितीही अनन्य भक्त असो, तो ईश्‍वर बनत नाही, तर स्थूल आणि सूक्ष्म देहांत असेपर्यंत तो ईश्‍वराचा अंशच राहतो. तो सर्व स्थूल आणि सूक्ष्म विश्‍वाला ईश्‍वराप्रमाणे व्यापू शकत नाही. ईश्‍वराच्या सर्व अलौकिक शक्ती त्याच्यात येत नाहीत. तो थोर महात्मा बनू शकेल; पण ईश्‍वर होऊ शकणार नाही. ब्रह्मलीन रामसुखदासजी महाराज यांनी एका लेखात लिहिले आहे की, मनुष्यात सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याचे ईश्‍वरी सामर्थ्य येत नाही.

३. आत्मा देहात असेपर्यंत आत्माच असेल, ईश्‍वर नाही !

आपला आत्मा आणि ईश्‍वर ह्यांच्यात मूलतः भेद नसला, तरीसुद्धा आत्मा देहात असेपर्यंत आत्माच असेल, ईश्‍वर नाही. आद्य शंकराचार्यांचा एक खूप सुंदर आणि उद्बोधक श्‍लोक आहे,

‘सत्यापि भेदापगमे नाथ तवाहं न मामकीनस्त्वम् ।
सामुद्रो हि तरङ्गः क्वचन समुद्रो न तारङ्गः ॥

– विष्णुषट्पदी, श्‍लोक ३

अर्थ : नाथ, तुझ्या-माझ्यातला भेद नष्ट झाला, हे जरी खरे असले, तरी मी तुझा आहे. तू माझा (अंश) नाहीस. लाट समुद्राची असते, समुद्र कधीही लाटेचा नसतो.’ लाटरूपी देह असेपर्यंत त्यातील पाणी समुद्राचा अंशच राहणार.’

– अनंत आठवले, गोवा (२७.४.२०२१)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.