राम नाही, तर मोत्याची माळही कवडीमोलच !

हनुमंत व प्रभु श्रीराम

एकदा श्रीराम आणि सीता यांना भेटण्यासाठी हनुमान येतो अन् त्या दोघांना मनोभावे नमस्कार करतो. तेव्हा सीतेला वाटते, ‘हा मारुति आपल्या स्वामींचा भक्त आहे. तो नेहमी त्यांची सेवा करतो. त्याला आपण काहीतरी द्यावे.’ ती तिच्या गळ्यातील माळ काढून हनुमानाला देते आणि म्हणते, ‘मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. माझ्याकडून तुला ही मोत्याची माळ देत आहे.’ माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो. माळेतील एकेक मणी काढतो आणि प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतो. प्रत्येक मणी फोडतो, बघून टाकून देतो. हे बराच वेळ चालू असलेले वागणे पाहून सीतामातेला राग येतो. तुला प्रेमाने दिलेल्या माळेचे हे काय केलेस ? प्रत्येक मणी फोडलास. तू असे का केलेस ?

हनुमंत म्हणतो, ‘मला माळेत आणि माळेतील कोणत्याही मण्यात राम दिसला नाही. ज्याच्यात राम नाही, ते सर्व मी टाकून दिले.’ मारुतीरायाचे बोलणे ऐकल्यावर सीतेला समजते की, मी श्रीरामाचे स्मरण न करताच माळ दिली. श्रीरामच सर्व काही करत असतो. ती हनुमानाची क्षमा मागते. श्रीरामाचे स्मरण करून ती हनुमानाला दुसरी माळ देते. ती माळ हनुमान लगेच गळ्यात घालतो.

जी गोष्ट देवाला स्मरून केली जाते, तीच गोष्ट हनुमानाला आवडते. प्रत्येक कृती भगवंताचे स्मरण करूनच केली पाहिजे.

(संदर्भ : ‘बालसंस्कार’ संकेतस्थळ)