
‘राम’ हा शब्द दिसायला जेवढा सुंदर आहे, त्यापेक्षा कित्येक पटींनी महत्त्वाचा आहे, तो त्याचा उच्चार ! ‘राम’ म्हटले मात्र की, शरीर आणि मन येथे त्याची वेगळीच प्रतिक्रिया उमटते. ती आपल्याला आत्मिक शांती देते. या शब्दाच्या ध्वनीविषयी पुष्कळ संशोधन झाले आहे. त्याचा परिणाम चमत्कारिक सिद्ध झालेला आहे; म्हणूनच म्हटले जाते, ‘रामापेक्षा श्रीरामाचे नाम श्रेष्ठ आहे.’
‘श्रीरामा’चा जप करत अनेक साधू-संत मुक्तीच्या पदाला पोचले आहेत. प्रभु श्रीरामाच्या नामाच्या उच्चाराने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. ज्या लोकांना ध्वनीविद्या अवगत आहे, त्यांना या शब्दाचा अपरंपार महिमा ठाऊक आहे.
जेव्हा आपण ‘श्रीराम’ म्हणतो, तेव्हा हवा किंवा रेती यांच्यावर एका विशिष्ट आकृतीची निर्मिती होते. त्याचप्रमाणे चित्तातही विशिष्ट लय येऊ लागते. जेव्हा मनुष्य सतत श्रीरामनामाचा जप करतो, तेव्हा रोमारोमात श्रीराम वास्तव्य करू लागतात. त्याच्या अवतीभोवती संरक्षककवच निर्माण झालेच म्हणून समजावे. प्रभु श्रीरामाच्या नावाचा प्रभाव विशेष असतो. आपली सर्व दुःख हरण करणारे नाव एकच आहे ते म्हणजे श्रीराम !
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज