पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीमुळे भविष्यात वादळे होत रहाणार ! – डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ

डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ

सिंधुदुर्ग – अरबी समुद्र दिवसेंदिवस तापत आहे. पर्यावरणातील पालटांमुळे हा प्रकार चालू आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची वादळे येतच रहाणार, अशी चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे, असे वृत्त दैनिक तरुण भारतच्या सिंधुदुर्ग आवृत्तीत प्रसिद्ध झाले आहे.

या वृत्तानुसार डॉ. गाडगीळ म्हणाले की, अरबी समुद्र तापण्याला आणखी पैलू आहेत. आपण मोठ्या प्रमाणात कोळसा जाळतो. त्याशिवाय किनारपट्टीचे संरक्षण करणारी झाडे तोडली जात आहेत. विकासाच्या नावाखाली आणि महामार्गांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. किनार्‍याला लागून अनेक बांधकामे होत आहेत. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची वादळे किनारपट्टीवर होतच रहाणार आहेत. याविषयी आपण काहीच करू शकत नाही. अशी परिस्थिती टाळायची असेल, तर किनारपट्टी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षतोड थांबवली पाहिजे. कांदळवनांचे संरक्षण झाले पाहिजे.