क्षुल्लक कारणावरून आत्महत्या करणारी तरुण मुले !

१५ ते २९ या वयोगटामध्ये सर्वाधिक दुसरे मृत्यूचे कारण हे आत्महत्या आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये १५ ते ३० या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे.  पौगंडावस्थेतील १.२ दशलक्ष मुलांकडून आत्महत्येचा प्रयत्न होतो, हेही वास्तव आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार जगात एकूण होणार्‍या आत्महत्यांच्या १० टक्के आत्महत्या या केवळ भारतात होतात. त्यातील ४० टक्के आत्महत्या या वय वर्षे ४० च्या आतील तरुणांनी केलेल्या असतात. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण, धर्मशिक्षणाचा अभाव ही कारणेही याला कारणीभूत आहेत !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘आयपीएल्’चा सामना पहातांना आई ओरडल्याने गळफास लावून मुलाची आत्महत्या ! 

‘‘इंडियन प्रिमिअर लीग’ या टी-२० क्रिकेटचा सामना पहातांना आई ओरडल्यामुळे मुंबईतील नीलेश गुप्ता (वय १८ वर्षे) याने गळफास लावून आत्महत्या केली. ९ एप्रिल २०१८ च्या रात्री तो क्रिकेटचा सामना पहात होता. आईने त्याला घराबाहेरील पाण्याची टाकी भरली का ? ते पहायला सांगितले; मात्र त्याने नकार दिला. तेव्हा त्या दोघांमध्ये भांडण झाले. आईने टीव्ही बंद केला. आई कामानिमित्त बाहेर गेली असतांना नीलेशने घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.’

तरुणांना नैराश्य येण्याची कारणे !

स्वत:च्या दिसण्याविषयी शहरातील ७९ टक्के तरुणी आणि ६८ टक्के तरुण समाधानी नाहीत. ६८ टक्के तरुणींना आणि ४८ टक्के तरुणांना ‘कॉस्मिक सर्जरी’ करून स्वत:चा चेहरा (लूक) पालटण्याची इच्छा आहे. स्वत:ची प्रतिमा फारशी चांगली नसल्याचा समज, प्रतिमा उंचावण्यात येत असलेल्या अडचणी ही तरुणांच्या तणावामागील महत्त्वाची कारणे आहेत. बहुसंख्य तरुणांच्या पालकांना तणाव दूर करण्यासाठी काय केले पाहिजे, याचीही माहिती नाही. केवळ १३ टक्के पालकांना त्यांच्या मुलांच्या मानसिक स्थितीची कल्पना आहे. शहरातील ३८ टक्के तरुणांना ‘ते कायम तणावाखाली असतात’, असे वाटते, तर २२ टक्के तरुणांना कधीकधी तणावाचा सामना करावा लागतो. तरुणींच्या संदर्भात हेच प्रमाण अनुक्रमे ४९ टक्के आणि २२ टक्के आहे.