कोरोनासह ‘ब्लॅक फंगस’ रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी २० खाटा असलेला वेगळा वॉर्ड ! – विश्‍वजित राणे, आरोग्यमंत्री

विश्‍वजित राणे,

पणजी, २१ मे (वार्ता.)-  गोवा राज्यात कोरोनासह ‘ब्लॅक फंगस’ रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २० खाटा असलेला वेगळा वॉर्ड ठेवण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘याव्यतिरिक्त बाल रुग्णांसाठी ६० खाटा असलेला अतीदक्षता विभाग बांधण्याचे काम चालू आहे. पुढे या विभागाची क्षमता १०० खाटापर्यंत वाढवण्यात येईल, तसेच सूपर स्पेशालिटी विभागात सद्यःस्थितीत आवश्यक असलेला सर्व सोयींनी युक्त असा अतीदक्षता विभाग (आय.सी.यू.) चालू करण्याचे नियोजन आहे.

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ३० कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ६२५ नवीन रुग्ण

    पणजी – गोव्यात २१ मे या दिवशी ३० रुग्णांचा मृत्यू झाला. यांमध्ये गोमेकॉमधील ९, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील ११ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र ३०२ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ५ सहस्र ६३ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ६२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३२.१ टक्के झाले आहे. दिवसभरात ३ सहस्र ७५ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १८७ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून १९ सहस्र ३२८ झाली आहे.