पूर परिस्थिती टाळण्यासाठी नद्यांकाठची अतिक्रमणे हटवण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आदेश !

नद्यांकाठची अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळेच पूरस्थिती निर्माण होते, हे सर्वश्रुत असतांना वर्षभरात यावर कारवाई का झाली नाही ? याचेही उत्तर जलसंपदामंत्र्यांनी जनतेला द्यावे.

जयंत पाटील

पुणे – यंदा पावसाळ्यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रात पूर येऊ नये म्हणून कृष्णा खोर्‍यातील नदीकाठावरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत. त्यानंतर अतिक्रमण झाल्यास तातडीने कारवाई करावी. तसेच पूररेषा नियंत्रणाविषयी कठोर कार्यवाही करावी. पुराविषयी वडनेरे समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची कार्यवाही करावी अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. पुण्यातील सिंचन भवन येथे कृष्णा-भीमा खोर्‍यातील नद्यांना पावसाळ्यात येणारा पूर आणि धरणांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. धरणांमधून विसर्ग चालू असतांना पंपाद्वारे अधिक पाणी उचलून ते दुष्काळी भागाला द्यावे असे सांगून पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेजारच्या राज्यांशी चर्चा चालत असल्याचेही त्यांनी सांगितले. १७५ धरणांच्या दरवाजांना संवेदक (सेन्सर) बसवले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.