वैभववाडी आणि देवगड तालुक्यांतील हानीग्रस्त भागांची पालकमंत्र्यांकडून पहाणी
सिंधुदुर्ग – नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात घरे, गोठे, मत्स्यव्यावसायिक, शासकीय मालमत्ता, शेती-बागायती यांची मिळून ३५ ते ४० कोटी रुपयांपर्यंतची हानी झाली आहे. यासह केवळ वीज वितरण कंपनीचीच ३५ ते ४० कोटी रुपयांची हानी झाली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. संबंधित हानीग्रस्तांना तातडीचे साहाय्य देण्यात आले आहे. त्यानंतरही शासनाकडून साहाय्य मिळण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम अॅपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
चक्रीवादळातील बाधितांना सर्वतोपरी साहाय्य करणार !
‘तौक्ते’ चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. या दुर्दैवी घटनेचा ज्यांना ज्यांना फटका बसला आहे, अशा सर्व बाधितांना राज्य सरकार आणि पालकमंत्री म्हणून आपण स्वतः सर्वतोपरी साहाय्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी वैभववाडी आणि देवगड तालुक्यांचा दौरा केला. पहाणीनंतर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
‘आपद्ग्रस्तांना धान्य वेळेवर पोचेल, याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी. बाधित गावांतील ज्या नळपाणीपुरवठा योजना विजेअभावी बंद आहेत, त्या ठिकाणी उच्च क्षमतेचे जनरेटर बसवून त्या त्या गावातील नळपाणीपुरवठा योजना तात्काळ चालू करण्यास प्राधान्य द्यावे. चक्रीवादळामुळे देवगड तालुक्यातील ज्या ४ खलाशांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांना शासनस्तरावर तातडीने आर्थिक साहाय्य मिळावे, यासाठी पाठपुरावा करणार आहे. आनंदवाडी बंदर येथे आपत्कालीन यंत्रणा, तसेच देवगड तहसील कार्यालयाच्या आवारात आपत्कालीन कक्ष येत्या १५ दिवसांत चालू करण्यात यावा. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येईल’, असे आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी या वेळी दिले.