गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केल्याविषयी गोवा खंडपिठाने राज्यशासनाची केली प्रशंसा !

  • गोव्यातील कोरोना व्यवस्थापनावर गोवा खंडपिठात सुनावणी

  • कोरोना लसीकरण जलदगतीने करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश

पणजी, १७ मे (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉत) ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून मागील १५ दिवसांपेक्षा आताची स्थिती चांगली आहे. गोमेकॉत ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून मागील २४ घंट्यांत एकही तक्रार आलेली नाही; मात्र गोमेकॉतील ऑक्सिमीटर, ऑक्सिजन फ्लो मीटर आणि काही औषधे यांचा तुटवडा यांविषयी प्रश्‍न सुटलेला नाही, असा निष्कर्ष ‘गोवा कोविड सर्व्हिसीस’ या अशासकीय संघटनेने १७ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडे नोंदवला. गोवा खंडपिठात राज्यातील कोरोना व्यवस्थापनावरून १७ मे दिवशी एकूण ६ जनहित याचिकांवर सुनावणी झाली. या वेळी ‘गोवा कोविड सर्व्हिसीस’ यांनी हा निष्कर्ष नोंदवला. गोमेकॉत मागणीनुसार ऑक्सिजनचा अखंडित पुरवठा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे गोवा शासन आणि शासनातील अधिकारी यांची गोवा खंडपिठाने प्रशंसा केली.

कोरोना लसीकरण जलदगतीने करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश

गोवा खंडपीठ पुढे राज्यशासनाला म्हणाले, ‘‘गोमेकॉतील ऑक्सिजनचा प्रश्‍न सोडवण्यास आणखी विलंब झाल्यास त्याचे पुढे पुष्कळ दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागले असते. लोकसंख्या अल्प असलेल्या गोव्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. गोव्यात २ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा आवश्यक तेवढा होण्यासाठी राज्यशासन केंद्राकडे संवाद का साधत नाही ?’’ यावर राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल देविदास पांगम म्हणाले, ‘‘कोरोना लसीकरणाचा गोव्याला जलदगतीने पुरवठा होण्यासाठी राज्यशासन केंद्राकडे पाठपुरावा करत आहे. त्याचप्रमाणे गोमेकॉत ऑक्सिमीटर, ऑक्सिजन फ्लो मीटर आणि काही औषधे यांचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. प्रवासासाठी कोरोना नकारात्मक (निगेटिव्ह) दाखल्याची आवश्यकता असलेल्यांनी कोरोनाची चाचणी खासगी रुग्णालयात करावी.’’