अश्‍लिल व्हिडिओ सिद्ध करून १ कोटीची खंडणी मागणार्‍या नगर येथील महिलेस साथीदारास अटक !

हनीट्रॅपच्या माध्यमातून अनेकांना ब्लॅकमेल करून पैसे लुबाडल्याचा पोलिसांचा संशय !

प्रतिकात्मक छायाचित्र

नगर – श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून अश्‍लिल व्हिडिओ बनवत १ कोटी रुपयांची खंडणी मागणार्‍या महिलेसह अमोल सुरेश मोरे या साथीदारास नगर तालुका पोलिसांनी १६ मे या दिवशी अटक केली आहे.  झडती दरम्यान पोलिसांनी सदर महिलेच्या घरातून गुन्ह्यातील १ अंगठी आणि रोख ६९ सहस्र ३०० रुपये जप्त केले आहेत, तसेच अमोल मोरे याच्याकडून १५ सहस्र रुपये जप्त करण्यात आले आहेत.

व्हिडिओ सिद्ध होताच आरोपींनी ‘आम्हास १ कोटी रुपये आणून दे नाहीतर सदर व्हिडिओ हा पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करेन’, अशी धमकी दिली. या वेळी आरोपींनी त्या व्यावसायिकास दोरीने बांधून मारहाण करून त्याच्याकडील ५ तोळे वजनाची सोन्याची साखळी, ४ अंगठ्या आणि ८४ सहस्र रुपये, असा एकूण ५ लाख ४४ सहस्र ३०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. महिलेचा त्रास असह्य झाल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसात तक्रार दिली होती.

सदर महिला आणि तिचा साथीदार अमोल मोरे यांनी हनीट्रॅपच्या माध्यमातून अनेकांना ब्लॅकमेल करून पैसे लुबाडल्याचा पोलिसांचा संशय आहे. अशा पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी भीती न बाळगता नगर तालुका पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि तालुका पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे.