१. सेवाभाव
१ अ. परिपूर्ण सेवा करणे : काकू आमच्या समवेत सेवा करतांना ‘नवीन आहेत’, असे जाणवत नव्हते. प्रत्येक सेवेची व्याप्ती ठाऊक असल्याप्रमाणे त्या सेवा करत होत्या. त्यांना काही सांगावे लागत नव्हते. त्या सेवा परिपूर्ण करत होत्या. त्यांचे संपूर्ण लक्ष सेवेकडेच होते.
१ आ. अधिकाधिक सेवा करण्याची ओढ: काकूंची नात (कु. ऋग्वेदी) त्यांना ‘खेळायला चल’, असे सांगायची. तेव्हा काकू तिला म्हणायच्या, ‘‘अगं, आधी मला सेवा करू दे.’’ तेव्हा आम्ही ‘काकू, सेवा राहू दे. तुम्ही ऋग्वेदीशी खेळायला जा. ऋग्वेदीशी खेळणे, ही सेवाच आहे’, असे सांगायचो.
१ इ. देहभान विसरून सेवा करणे : अतीवृष्टीमुळे आश्रमात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असतांना आम्ही धान्य वरच्या माळ्यावर ठेवण्यासाठी धान्याच्या गोण्या बांधत होतो. काकू देहभान विसरून गोणीत भराभर धान्य भरत होत्या. ‘काकू करत असलेली सेवा पाहून त्यांना सेवेची किती तळमळ आहे !’, असे मला जाणवले. तेव्हा मी देवाला म्हणाले, ‘देवा, काकूंची लवकर प्रगती होऊ दे.’
२. सहसाधकांची आध्यात्मिक उन्नती होण्याची तळमळ
साधकांचा प्रतिदिन सेवेनिमित्त १५ मिनिटांचा सत्संग घेतला जातो. काकू सत्संगात उपस्थित असायच्या. तेव्हा एकदा मी काकूंना विचारले, ‘‘तुम्हाला काही सांगायचे आहे का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या ‘‘साधक चांगले प्रयत्न करत आहेत. साधकांनी प्रत्येक सेवा स्वतःची समजून केली, तर सर्वच साधक लवकर पुढे जातील.’’ मला काकूंचे बोलणे पुष्कळ भावले. त्या दिवसापासून साधक सर्व सेवा आपलेपणाने करत आहेत.
३. स्वतःला पालटण्याची तळमळ
त्या आश्रमातून निघतांना साधकांना म्हणाल्या, ‘‘माझ्या काही चुका झाल्या असल्यास सांगा.’’ तेव्हा आम्ही त्यांना मनमोकळेपणाने बोलण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले.
अशा आमच्या लाडक्या गोडसेकाकूंचे गुण लक्षात आणून दिले, त्यासाठी मी श्रीकृष्णाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. जयमाला पडवळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१९)