नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार ३ कारागृह अधीक्षकांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद !

बंदीवान मदनकुमार श्रीवास यांच्याकडे खंडणी मागून त्यांचा छळ केल्याचे प्रकरण

बंदीवानांकडून खंडणी घेणारे कारागृह अधीक्षक पोलीसदलात काम करण्याच्या पात्रतेचे नाहीत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? अशा घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास उडत चालला आहे !

नागपूर – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील मध्यवर्ती कारागृहातील ३ तत्कालीन कारागृह अधीक्षकांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तत्कालीन सर्कल अधीक्षक कृष्णा चौधरी, बडी सर्कल अधिकारी गुलाब खरडे आणि रवींद्र पारेकर अशी त्यांची नावे आहेत. याचिकाकर्ते मदनकुमार श्रीवास बंदीवान असतांना तिन्ही अधिकार्‍यांनी लाच घेऊन बंदीवानांच्या मर्जीने त्यांना अमली पदार्थ, भ्रमणभाष आणि आवडीचे जेवण पुरवले होते, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

वर्ष २०१४ मध्ये येथील कारागृहात बंदीवान मदनकुमार श्रीवास जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना त्यांच्याकडे वरील अधिकार्‍यांनी खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्याने अधिकार्‍यांनी श्रीवास यांचा छळ केला. श्रीवास कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी या संदर्भात धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती; मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी येथील खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. (खंडणीखोरांवर कारवाई न करणारे पोलीस गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याने संबंधित पोलीस ठाण्यातील दोषी पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)

५ मे या दिवशीच्या सुनावणीत न्यायालयाने ‘तीनही अधिकार्‍यांची गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांद्वारे विभागीय चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत या तीनही अधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे’, असे निर्देश दिले.