कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या पाहून आम्ही हतबल झालो, आमचे प्रयत्न अपयशी ठरल्याविषयी खंत व्यक्त करतो; पण प्रयत्न चालूच ठेवू ! – न्यायालय
पणजी, १३ मे (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉतील) ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात १३ मे या दिवशी पुन्हा सुनावणी झाली. या वेळी न्यायालय गोवा शासनाला म्हणाले, ‘‘ऑक्सिजनच्या अभावी एकाचाही मृत्यू होणार नाही, याची राज्यशासनाने निश्चिती करावी’, असा आदेश १२ मे या दिवशी राज्यशासनाला दिला होता; मात्र आदेश देऊनही १२ मे या दिवशी गोमेकॉत कोरोनाबाधित एकूण ४० रुग्णांचे निधन झाले आणि यामधील १५ रुग्णांचे रात्री २ ते सकाळी ६ या ‘काळ्या वेळेत’ झाले. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या पाहून आम्ही हतबल झालो आहोत. रुग्णांचे जीव वाचवण्यास आम्ही अपयशी ठरलो आहोत. आम्ही खंत व्यक्त करतो; मात्र आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवू.’’ ऑक्सिजनअभावी गोमेकॉत १२ आणि १३ मे या दिवशी एकाही रुग्णाचा मृत्यू होऊ देऊ नये, असा आदेश गोवा खंडपिठाने राज्यशासन आणि गोमेकॉचे अधिष्ठाता (डीन) यांना दिला होता. या पार्श्वभूमीवर गोवा खंडपिठाने ही खंत व्यक्त केली आहे.
न्यायालय पुढे म्हणाले, ‘‘गोमेकॉत १ मेनंतर ‘काळ्या वेळेत’ (रात्री २ ते सकाळी ६) कोरोनाबाधित अनेक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. या ‘काळ्या वेळेतील’ मृत्यू हे ऑक्स्जिन सिलिंडर वाहून नेण्यासाठी ट्रॉली न मिळणे, सिलिंडर जोडण्यास अडचण येणे आदी कारणांमुळे होत असल्याचा दावा राज्यशासन करत होते. या कारणांमुळे कोरोनाबाधित रुग्णांना भीषण परिणामांना सामोरे जावे लागणे, हे आम्हाला खूप दु:खदायक वाटते. ‘काळ्या वेळेत’ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमागे नेमके कारण कोणते आहे ? हे मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे होत असल्याचे आकडेवारी सांगते आणि गोेमेकॉ हे नाकारू शकणार नाही. हा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. राज्यशासन या समस्या तातडीने सोडवणार, अशी आशा बाळगतो. ऑक्सिजनच्या पुरवठ्यातील समस्येमुळे रुग्णांना त्यांचा बहुमूल्य जीव गमवावा लागणार नाही.’’
|
यावेळी गोवा खंडपिठाने आरोग्य खात्याच्या सचिवांना सांगितले, ‘‘ऑक्सिजन टाकी, डुरा सिलिंडर, ऑक्सिजन कन्स्ट्रेटर आणि ट्रॅक्टरचालक यांच्या उपलब्धतेसंबंधीचा अहवाल शुक्रवार, १४ मे या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपत्राद्वारे (ई-मेलद्वारे) खंडपिठाला कळवा. या अहवालावर खंडपीठ समाधानी नसल्यास शनिवार, १५ मे या दिवशी या प्रकरणी पुन्हा सुनावणी घेतली जाईल अन्यथा या प्रकरणी सोमवार, १७ मे या दिवशी पुढील सुनावणी होईल. शुक्रवारी, १४ मे या दिवशी सार्वजनिक सुटीमुळे न्यायालयाला सुटी असेल.’’
वैद्यकीय कारणामुळे रुग्णातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते ! – देविदास पांगम, अॅडव्होकेट जनरल
अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम खंडपिठाला म्हणाले, ‘‘ऑक्सिजन पुरवठ्याविषयी स्थानिक प्रश्नासमवेतच याला एक वैद्यकीय कारणही आहे. वैद्यकीय कारणामुळे रुग्णातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते आणि ही एक जागतिक समस्या आहे. यावर केवळ तज्ञ मंडळीच भाष्य करू शकतील. प्रशिक्षित ट्रॅक्टरचालकांच्या अभावामुळे ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पातून रुग्णालयापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे, तसेच ऑक्सिजनचा सिलिंडर पालटण्यासही वेळ लागतो.’’
या वेळी गोमेकॉला ऑक्सिजनच्या पुरवठा करणार्या ‘स्कूप ऑक्सिजन’ या आस्थापनाचे प्रतिनिधी हस्तक्षेप करून खंडपिठाला म्हणाले, ‘‘ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडर यांची कमतरता नाही.’’ यावर अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम पुढे म्हणाले, ‘‘स्कूप’ आस्थापनाने दक्षिण गोव्यातील काही रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा थांबवून तो ऑक्सिजन गोमेकॉला पुरवला. यामुळे नंतर या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली. त्यामुळे पुन्हा त्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा अतिरिक्त पुरवठा करण्यात आला.’’