वास्तू आणि दिशा

वास्तू आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीशी निगडित असल्याने बांधकामापूर्वी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. समृद्धी, यश, शांती, चैतन्य यांचा प्रत्यक्ष संबंध वास्तूशी जोडला जात असल्याने वास्तूची निवड आणि बांधकाम करतांना नियोजन अन् वास्तूशास्त्रातील मूलभूत नियम यांचा आग्रह धरतांना बहुतेक जण दिसतात. यामागे अंधश्रद्धेचा भाग नसतो. घर बांधतच आहोत, तर वास्तूचे काही नियम पाळून वास्तूशास्त्राप्रमाणे घर बांधण्याकडे बहुतेकांचा कल असतो.

घरासाठी प्लॉट कोणत्या दिशेला असावा ?

  • घर बांधण्यापूर्वी सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे प्लॉटची निवड. प्लॉटच्या उत्तर दिशेला किवा पूर्वेकडे मोठा वृक्ष नाही याची निश्चिती करतांनाच दक्षिणेस खड्डा किवा विहीर नसावी याची दक्षता घ्यावी.
  • प्लॉटचा आकार त्रिकोणी नसावा. तो चौरस किंवा समचतुष्कोण आकार घर बांधण्याकरता आदर्श मानला जातो.
  • वाकड्या-तिकड्या आणि अनियमित आकाराच्या प्लॉटवर बांधकाम केल्यास आर्थिक हानी किंवा मतभेदात वाढ होण्याची शक्यता असते.
  • मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रांत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पूर्व दिशेकडे तोंडवळा असणारे घर शुभ मानले जाते. उत्तर दिशेकडील प्लॉटही उत्तम.
  • नदी, तलाव, विहीर, झरे प्लॉटच्या पूर्वेस किवा उत्तरेस असावे.

घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला हवे ?

घराचा मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार कोणत्या दिशेने असावे यावर घराचे सौंदर्य खुलण्यासमवेतच इतरही गोष्टी निगडित असतात. घराचा मुख्य दरवाजा ईशान्येस असावा. स्वयंपाक घर मोकळे, हवेशीर असण्यासोबतच त्याची दिशाही लक्षात घ्यावी. गृहिणी स्वयंपाक करतांना तोंड दक्षिणेकडे नसले म्हणजे झाले. दक्षिण किवा पश्चिमेस शौचालय ठेवल्यास योग्यच. अगदी दुसरा पर्यायच नसला, तर पश्चिमेकडे दरवाजा ठेवण्यासही हरकत नाही. घर बांधून काही जागा शेष राहील, याची दक्षता घ्यावी. उत्तर किंवा पश्चिमेकडचा भाग मोकळा ठेवल्यास चैतन्यात वाढच होईल.

(संदर्भ : https://marathi.webdunia.com/)