लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा पुणे महानगरपालिकेचा निर्णय

महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे – कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमध्ये १८ वर्षांखालील वयाच्या मुलांना धोका असल्याचे वर्तवले जात आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने शहरातील बालरोगतज्ञांना एकत्र घेऊन नियोजन करण्यास आरंभ केला आहे. यामध्ये महापालिकेचे रुग्णालय अद्यायावत करण्यासह डॉक्टरांचे साहाय्य घेऊन ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात महापालिकेने ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये तज्ञ डॉक्टरांची मते जाणून घेण्यात आली.

लहान मुलांचे लवकर निदान झाल्यास त्यांना योग्य उपचार देणे शक्य आहे. यासाठी महापालिकेला साहाय्य करणार असल्याचे मत बालरोगतज्ञ संजय नातू यांनी व्यक्त केले. लहान मुलांसाठी अद्ययावत सुविधांचे ‘चाइल्ड केअर सेंटर’ येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात चालू करत आहे. लहान मुलांमधील संसर्ग वाढल्यास पूर्णपणे सिद्धता असावी, या दृष्टीने ‘टास्क फोर्स’ महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. ‘ससून रुग्णालयातही लहान मुलांसाठी अतीदक्षता विभाग असेल’, असे मत बालरोग तज्ञ डॉ. आरती किनीकर यांनी व्यक्त केले.