ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे खाजगी कोव्हिड रुग्णालयात ६ रुग्णांचा मृत्यू

आक्रमक नातेवाइकांमुळे आधुनिक वैद्यांनी पळ काढला

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) – येथे एका खासगी कोविड रुग्णालयात २ मे या दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने मृतांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास चालू केले. (असे आहे, तर या दुर्घटनेचे दायित्व निश्‍चित करून संबंधितांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. – संपादक) ते आक्रमक झाल्याने संबंधित आधुनिक वैद्यांनी रुग्णालयातून पळ काढला. काही नातेवाइकांनी रुग्णालयामध्ये तोडफोड केल्याची चर्चा आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. या रुग्णालयाच्या देयकावरून प्रशासनाकडे यापूर्वीच काही तक्रारी आलेल्या आहेत. या प्रकारानंतर रुग्णांच्या नातेवाइकांचा संताप आणखी वाढला. संतापलेल्या नातेवाइकांनी रुग्णांवरील उपचारांची लाखो रुपये मूल्याची देयके न देताच मृतदेह तेथून हलवले.

रवींद्र सबनीस, तहसीलदार, ईश्‍वरपूर यांनी सांगितले की, संबंधित रुग्णालयामध्ये देयकावरून वादावादी झाल्याची तक्रार आली आहे. ऑक्सिजनच्या अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची अद्याप कोणत्याही रुग्णांच्या नातेवाइकांची तक्रार आलेली नाही; परंतु रुग्ण संख्या वाढल्याने ऑक्सिजन अल्प पडू लागला आहे, ही वस्तूस्थिती आहे. मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा अल्प होत आहे.