इच्छाशक्ती आणि सकारात्मकता असेल, तर मनुष्य प्रत्येक कठीण परिस्थितीतून मार्ग काढतो. असा मनुष्य मग कोरोनासारख्या आपत्तीकडेही यात सकारात्मक काय करता येईल ? ते पहातो. सोलापूर येथील जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी असाच सकारात्मक विचार ठेवून ३ मेपासून एक नवा उपक्रम चालू केला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग पुष्कळ प्रमाणात वाढल्याने अनेक नागरिक आणि कोरोनाबाधित रुग्ण पुष्कळ दडपणाखाली आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे आलेल्या ताणातून आत्महत्या आणि हृदयविकार यांचे प्रमाण वाढले. रुग्ण त्याच्या नकारात्मक मानसिकतेमुळे औषधोपचारालाही सकारात्मक प्रतिसाद देत नाही, हा भाग लक्षात घेऊन नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेतील स्तुत्य भाग म्हणजे ‘कोविड केअर सेंटर’मध्ये व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार यांसह अन्य माध्यमांचे साहाय्य घेऊन रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांचा ताणतणाव न्यून करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आपल्यामध्ये जिद्द निर्माण व्हावी, यासाठीही या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे.
याच प्रकारे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी जेव्हा दळणवळण बंदी लागू करण्यात आली, तेव्हा समाजाचे मनोबल आणि आत्मिक बळ वाढण्यासाठी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन सत्संग शृंखला’ चालू करण्यात आली. अद्यापही ही शृंखला चालू आहे. हे सत्संग लाखो दर्शकांसाठी ‘संजीवनी’ ठरत आहेत. मनावर नकारात्मक विचारसरणीचा पगडा बसल्यास मनुष्याच्या स्वभावातील समतोल ढासळतो. धैर्य खचते. हे टाळण्यासाठी बालपणीपासूनच मुलांवर सकारात्मक संस्कार करणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक राहिल्यास अशक्य ते शक्य होऊन सक्षमता येते. अध्यात्माची जोड देऊन सकारात्मकता रुजवणारे उपक्रम मोलाची भूमिका बजावतील. राज्य आणि केंद्र शासनाने शालेय शिक्षणासह सर्व स्तरांवर असे उपक्रम राबवावेत. असे केल्यास सामान्य नागरिक कोणत्याही आपत्तीला निर्भयतेने तोंड देऊ शकेल !
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर