मंचर (जिल्हा पुणे) – मंचर उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी जर्मनीहून १४ उच्च प्रतीचे व्हेंटिलेटर मागवण्यात आले आहेत. तसेच एक १ कोटी २४ लाख रुपये मूल्याचा लिक्विड ऑक्सिजन टँक बसवला जाईल. याचसमवेत कार्डिअॅक रुग्णवाहिकाही उपलब्ध होईल. यामुळे येत्या आठ दिवसांत रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतील, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. मंचर (तालुका आंबेगाव) येथे २ मे या दिवशी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न चालू असून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यासाठी राज्य सरकार ६ सहस्र ५०० कोटी रुपये एवढा निधी व्यय करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.